Team MyPuneCity – गांजा विक्रीसाठी जात असलेल्या(Pune Crime News 03 May 2025) तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 318 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (1 मे) सायंकाळी शंकर कलाटे नगर वाकड येथे करण्यात आली.
अजय प्रकाश पवार (19, वाकड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने हा गांजा पुनीतकुमार शेट्टी (वाकड) याच्याकडून आणला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे शेट्टी याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार कपिलेश इगवे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर कलाटे नगर रोडवर एक तरुण संशयितरित्या जात असताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या दुचाकीची पाहणी केली असता त्यामध्ये 318 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त आढळून आला. पोलिसांनी गांजा, दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण 82 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अजय पवार याला पुनीतकुमार शेट्टी याने विक्रीसाठी गांजा दिला असल्याचे समोर आले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
चाकण मध्ये बेकायदेशीरपणे गोमांस वाहतूक
चाकण परिसरात पुणे नाशिक महामार्गावर बेकायदेशीरपणे गोमांस वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी 250 किलो गोमांस जप्त केले आहे. ही कारवाई शुक्रवारी (2 मे) सकाळी करण्यात आली.
पोलीस अंमलदार संतोष फटांगरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mogara Mahotsav : बनेश्वर महादेव मंदिरात चंदनउटी सोहळ्यानिमित्त मोगरा महोत्सव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथे चाकण पोलिसांना एका कारमधून गोमांस वाहतूक केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित कारची तपासणी केली असता त्यामध्ये 45 हजार रुपये किमतीचे 250 किलो गोमांस आढळून आले. पोलिसांनी कार आणि गोमांस असा एकूण चार लाख 50 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
PCMC: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा उपक्रमात राज्यात दुसरे स्थान
ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू
भरधाव वेगात जाणाऱ्या हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकी वरील व्यक्ती गंभीर जखमी झाला. तर त्याच्या पत्नीच्या अंगावरून ट्रक गेल्याने तिचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (2 मे) सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील खराबवाडी येथे घडला
विजया तुकाराम ठोकळ (40, महाळुंगे, खेड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती तुकाराम विष्णू ठोकळ (46) हे गंभीर जखमी झाले आहेत. तुकाराम ठोकळ यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हायवा ट्रक (एम एच 14 एच जी 89 71) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम ठोकळ आणि त्यांच्या पत्नी विजया ठोकळ हे दुचाकीवरून खराबवाडी येथून जात होते. सारा सिटी चौकात आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला हायवा ट्रकने पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात ठोकळ दांपत्य रस्त्यावर पडले. तुकाराम हे गंभीर जखमी झाले. तर विजया यांच्या अंगावरून हायवा ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
सामायिक जागेत पत्रे टाकू नका म्हटल्याने पाच जणांना मारहाण
सामायिक जागेत पत्रे टाकू नका म्हटल्याने सहा जणांनी मिळून पाच जणांना मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (2 मे) सकाळी खेड तालुक्यातील वडगाव घेनंद येथे घडली.
याप्रकरणी 45 वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिंधू तुळशीराम बवले (52), तुळशीराम नामदेव बवले (59), समीर तुळशीराम बवले (30), सुरज तुळशीराम बबले (27), अंकुश नामदेव बबले (50) आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला नेहमीप्रमाणे त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूला काम करत होत्या. तिथे असलेल्या सामायिक जागेत आरोपींनी पत्रे टाकले. तिथे पत्रे टाकू नका. गाड्या काढता येणार नाहीत असे फिर्यादी यांनी आरोपींना सांगितले. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी महिला, त्यांचे पती, दीर आणि दोन पुतणे यांना लाकडी दांडके, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी समीर बबले आणि सुरज बबले या दोघांना अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.
गुंतवणुकीच्या बहाण्याने 17 लाखांची फसवणूक
गुंतवणुकीच्या बहाण्याने बावधन येथील एका व्यक्तीची 17 लाख 39 हजार 400 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 10 ते 17 मार्च या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडली.
याप्रकरणी पीडित व्यक्तीने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी व्यक्ती सोबत टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क केला. न्युझीलँड गोल्ड मर्चंट या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगली रक्कम मिळेल असे अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीला आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना काही टास्क देण्यात आले. टास्क पूर्ण झाल्यावर त्यांच्या बँक खात्यात काही रक्कम पाठवण्यात आली. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 17 लाख 76 हजार 335 रुपये घेतले. दरम्यान त्यांना काही रक्कम परत करत उर्वरित 17 लाख 39 हजार 400 रुपये परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करीत आहेत.