Team MyPuneCity – भरधाव वेगातील ट्रकने धडक दिल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (4 मे) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास शिक्रापूर चाकण रोडवर ( Pimpri Chinchwad Crime News 6 may 2025) घडली.
रोहित सत्यम जाधव (चाकण) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सत्यम विजय कोते (21, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रामराव सौदाजी नांगरे (59, सणसवाडी, शिरूर) असे अटक केलेल्या आरोपी ट्रक चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सत्यम हे आपला मित्र रोहित जाधव यांच्यासोबत भाकरी आणण्यासाठी चालले होते. ते शिक्रापूर-चाकण रोडवरील चौधरी ढाब्याच्या जवळ, विशाल गार्डन चौकाजवळ आले असता आरोपी चालवत असलेल्या ट्रकने एका थांबलेल्या महिंद्रा जीपला धडक दिली. या अपघातात रोहित सत्यवान जाधव याचा मृत्यू झाला असून, फिर्यादी व राहूल संतोष कोळी हे गंभीर जखमी झाले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
वाकी फाटा येथे कारच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जखमी ( Pimpri Chinchwad Crime News 6 may 2025)
भरधाव वेगातील इरटिका गाडीने धडक दिल्यामुळे एका दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. ही घटना 29 एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर वाकी फाटा येथे घडली.
संतोष गोविंद बेडुरे (46, खेेड) यांनी सोमवारी (5 मे) याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अंशिका टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या (एमएच 10/डीटी 6189) या इरटिका गाडीवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 एप्रिल रोजी दुपारी वाकी फाटा येथे त्यांच्या दुचाकीला अंशिका टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सची इरटिका गाडीने धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला. या धडकेत फिर्यादी संतोष यांच्या हाताला फ्रॅक्चर व डोक्याला टाके पडले. तसेच दुचाकीवरील चंद्रकांत जाचक हे किरकोळ जखमी झाले.चाकण पोलीस तपास करीत आहेत.
भोसरी प्राधिकरण येथे पोलिसांकडून सव्वादोन लाखांचा गुटखा जप्त ( Pimpri Chinchwad Crime News 6 may 2025)
विक्री करण्यासाठी घेऊन चाललेला दोन लाख 39 हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई भोसरी प्राधिकरण येथे करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिओम लक्ष्मण जोगदंड (20) आणि परशुराम प्रदीप ढेपे (दोघेही रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार प्रदीप गोरखनाथ गोडांबे (वय 38) यांनी याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी 4.50 च्या सुमारास सृष्टी टेक्नोलॉजी, सेक्टर 07, भोसरी येथे हरीओम जोगदंड आणि पाहिजे आरोपी परशुराम ढेपे यांच्याकडून 2.39 लाख रुपये किंमतीचा गुटखा व 6 लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा एकूण 8.39 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
निगडी प्राधिकरण येथे निगडीत गांजासह एकास अटक ( Pimpri Chinchwad Crime News 6 may 2025)
गांजा बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई सोमवारी (5 मे) दुपारी तीन वाजताच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे करण्यात आली.
शांताराम रामचंद्र कांबळे (38, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अंमलदार उद्धव बद्रीनाथ खेडकर यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 मे रोजी दुपारी 3.05 वाजता निगडी प्राधिकरण सेक्टर नंबर 24 येथील परिसरात पोलिसांनी 230 ग्रॅम गांजासह आरोपी कांबळे याला अटक केली. त्याच्याकडून 11 हजार 500 रुपये किंमतीचा 230 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.