मावळ ऑनलाईन – कामशेत परिसरातील पिंपळोली गावात (Pimpaloli Crime News)रिक्षा लावण्याच्या कारणावरून वाद झाल्याच्या रागातून दोन इसमांनी रिक्षा चालकावर जीवघेणा हल्ला करून त्याला गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवार ( दि.9 ) मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. या प्रकरणी फिर्यादी विजय देवीड ओहोळ (वय 42 , रा. स्वराज्यनगर, लोणावळा) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी सोमनाथ केदारी (रा. ताजे, ता. मावळ, जि. पुणे) हे दोघेही लोणावळ्यातील शांती चौकाजवळ रिक्षा स्टँडवर गेल्या दहा दिवसांपासून रिक्षा उभ्या करीत होते. यावेळी रिक्षा लावण्याच्या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली होती. त्याचा राग मनात धरून आरोपी केदारीने 9 सप्टेंबर रोजी फिर्यादीस फोन करून “पिंपरीचे रिक्षाचे भाडे करतोस का?” असे विचारले. फिर्यादीने होकार दिल्यावर आरोपींनी त्याला पिंपळोली येथे बोलावले.
तेथे आरोपी सोमनाथ केदारी व त्याचा एक साथीदार यांनी संगनमत करून फिर्यादीस “तू माझ्या भावाला रिक्षा स्टँडवर काय बोलला होतास?” असे म्हणत हातातील लाकडी दांडक्याने डोक्यात, हातावर व शरीरावर बेदम मारहाण केली. त्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला. याचदरम्यान आरोपींनी त्याच्या शर्टमधील 200 रुपयांची रोकड हिसकावून घेतली. शिवाय “पोलीसाकडे तक्रार केल्यास जीव घेईन” अशी धमकी दिली.
Maval: शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर; मावळ तालुका प्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती
Pune: ‘पुरुषोत्तम’चा शुक्रवारी पारितोषिक वितरण समारंभ;नाना पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती
घटनेनंतर आरोपींनी फिर्यादीला कार्ला फाटा येथील दवाखान्यात नेत असल्याचे सांगून रिक्षामध्ये बसवले. मात्र, मार्गात वेट एन जॉय पार्क जवळील एका कच्च्या रस्त्यावर रिक्षा घेऊन गेले. तेथे स्मशानभूमीसमोर रिक्षा बंद पडली असता फिर्यादीने वाटसरूंना मदतीसाठी आवाज दिला. त्यावेळी आरोपींनी त्याला चिखलात पाडून दगडानेही मारहाण केली.
या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.