मावळ ऑनलाईन – कौटुंबिक नातेसंबंधाला काळिमा फासणारी व मावळ तालुक्यातील नागरिकांना हादरवून सोडणारी एक थरारक घटना (Lonavala Murder) उघडकीस आली आहे. मेहुणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून साडूनेच साडूचा खून केल्याची ही घटना शुक्रवारी (दि. १०) रात्री साडेअकरा ते शनिवारी (दि. ११) सकाळी आठ या वेळेत मुंढावरे येथील इंद्रायणी नदीवरील पुलाजवळ घडली.
या घटनेत महेश मारुती अंभोरे (वय ३५, रा. तुंगारळी, लोणावळा) या तरुणाचा खून (Lonavala Murder) झाला असून, गुरुनाथ एकनाथ पाटील (वय ३२, रा. गोल्ड व्हॅली, जैन मंदिर, लोणावळा) या त्याचाच साडूने गुन्हा केल्याचे उघड झाले आहे. घटनेनंतर फरार झालेल्या गुरुनाथ पाटीलला लोणावळा पोलिसांनी अवघ्या तीन तासांत कोल्हापूर येथून बेड्या ठोकत अटक केली.
पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महेश अंभोरे यांचे लग्न मे २०२५ मध्ये झाले होते. लग्नानंतर त्यांच्या पत्नीचा तिच्या बहिणीच्या नवऱ्याशी म्हणजेच गुरुनाथ पाटील याच्याशी जवळीक वाढल्याची चर्चा होती. या नात्यामुळे दोघांमध्ये अनेकदा वाद होत होते. शुक्रवारी रात्री दोघांची पुन्हा भेट झाल्यावर वाद चिघळला आणि गुरुनाथ पाटीलने संतापाच्या भरात महेश अंभोरे यांचा गळा आवळून व धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला.
घटनेनंतर (Lonavala Murder) आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी तत्परतेने सापळा रचून तो कोल्हापूर येथे लपून बसल्याची माहिती मिळवली आणि त्याला अवघ्या तीन तासांत ताब्यात घेतले.
ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास लोणावळा पोलीस करत आहेत.