मावळ ऑनलाईन – खंडाळा परिसरातील राजुजी कॉलनी येथील एका बंगल्यात भरदिवसा घडलेल्या घरफोडीत अज्ञात चोरट्याने तब्बल २९ लाख २६ हजार रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना ९ जून २०२५ रोजी सकाळी उघडकीस आली.
वीणा नारायण मुळे (वय ६५ वर्षे, रा. भवानीप्रसाद बंगला, राजुजी कॉलनी, घुगळे बँक हाऊस शेजारी, जुना खंडाळा, लोणावळा) यांनी याबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, फिर्यादींच्या बंगला परिसरातील मुख्य गेट व दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आणि कपाटातील मौल्यवान दागिने लंपास केले.
चोरट्याने खालीलप्रमाणे ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे:
- १२ तोळ्यांच्या ६८ सोन्याच्या बांगड्या – ₹७,२०,०००
- ८ तोळ्यांच्या ६४ सोन्याच्या पाटल्या – ₹४,८०,०००
- ५ तोळ्यांच्या २ सोन्याच्या साखळ्या – ₹३,००,०००
- १० तोळ्यांचे २ शिंदेशाही तोडे – ₹६,००,०००
- १.५ तोळ्याची सोन्याची अंगठी – ₹९०,०००
- ६ ग्रॅमचे ३ सोन्याचे कानातले जोड – ₹३६,०००
- ८.९ तोळ्यांचे २ सोन्याचे नेकलेस – ₹५,४०,०००
- १ तोळ्याच्या ४ सोन्याच्या बांगड्या – ₹६०,०००
- २ किलो चांदीचे भांडे व पूजावस्तू – ₹१,००,०००
एकूण चोरी गेलेला ऐवज – ₹२९,२६,०००
Maval Crime News : गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक
ही घटना ९ जून रोजी सकाळी ८ वाजण्यापूर्वी घडली असावी, अशी पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. सदर गुन्ह्याची नोंद लोणावळा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू आहे. खंडाळा परिसरात पूर्वीही अशा प्रकारच्या घरफोडीच्या घटना घडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.