मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील कोसळलेला पूल (KundMala Bridge) रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. त्याबाबत पुलाच्या सुरुवातीला फलक देखील लावण्यात आला आहे. असे असताना देखील नागरिक या पुलाचा रहदारीसाठी वापर करत होते. केवळ पादचार्यांसाठी असलेला हा पूल वाहनांची ये-जा करण्यासाठी देखील वापरला जात होता. धोकादायकपणे पुलाचा वापर करण्यात आला. तसेच एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाल्याने पूल कोसळला असल्याचे स्थानिक सांगतात.
निधी मंजूर पण कामाला विलंब
शेलारवाडी येथे संरक्षण दलाच्या डेपोकडून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी इंद्रायणी नदीवर नवीन पूल (Kundmala Bridge) बांधण्यासाठी शासनाने आठ कोटी रुपयांचा निधी वर्षभरापूर्वी मंजूर केला आहे. निधी मंजूर होऊन देखील अद्याप पुलाचे काम सुरू झाले नाही. पुलाच्या कामात दिरंगाई का झाली याबाबत देखील चौकशी होण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
Kundmala Accident Update : इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळला; ४ मृत, ५१ जखमी, पाहा संपूर्ण यादी…
सहा महिन्यांपूर्वीही एका दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू
सहा महिन्यांपूर्वी या पुलावरून (Kundmala Bridge) रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जात असताना एका स्थानिक नागरिकाचा पाण्यात पडल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या विनंतीनुसार एका सामाजिक संस्थेने पुलाच्या दोन्ही बाजूला जाळी बसवून दिली होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली. आता या पुलाच्या दोन्ही बाजूला ग्रीन नेट बसवण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात होती.