Team MyPuneCity – पुणे शहरात भांगयुक्त बंटा गोळ्यांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एका आरोपीस अटक केली आहे. या कारवाईत ४ किलो ८०० ग्रॅम वजनाच्या, १०,८०० रुपये किमतीच्या भांगयुक्त बंटा गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई साई सृष्टी रेसिडेन्सीसमोर, देशमुखवाडी, कॅनोल रोड, शिवणे, पुणे येथे करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दिनेश मोहनलाल चौधरी (वय ३० वर्षे, रा. राधा कृष्ण अपार्टमेंट, देशमुखवाडी, शिवणे, पुणे) असे आहे. चौधरी हा मूळचा राजस्थान राज्यातील असून, तो गेल्या पाच वर्षांपासून पुण्यात किराणा मालाचे दुकान चालवत होता. पोलीस तपासात तो भांगयुक्त बंटा गोळ्या कोठून आणत होता आणि कुठे विक्री करीत होता याची चौकशी सुरू आहे.
Hinjawadi Bus Fire : ट्रॅव्हलर आग प्रकरणी चालकावर खुनाचा गुन्हा
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान ही माहिती मिळवत तातडीने कारवाई केली. आरोपीकडून २४ पॅकेट (प्रत्येकी २०० ग्रॅम वजन) सापडले, जे तो अवैधरीत्या विक्रीसाठी जवळ बाळगत होता. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
World Sparrow Day : जागतिक चिमणी दिनानिमित्त नवीन समर्थ विद्यालयात ‘एक घास चिऊचा’ उपक्रम
या कारवाईचे नेतृत्व अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे १) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
सदर कारवाईत अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, तसेच पोलीस अंमलदार सचिन माळवे, संदीप शिर्के, विपुल गायकवाड, विशाल दळवी, मारुती पारधी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव आणि योगेश मोहिते यांनी सहभाग घेतला.