मावळ ऑनलाईन –एखाद्या छोट्याश्या राज्याच्या बजेटसारखी ( Talegaon Dabhade)कोट्यावधी रुपयांची विकासकामे मावळ मतदार संघात होत असताना आमदार सुनील शेळके यांच्या कामाची व्यापकता लक्षात घेण्याजोगी आहे.सोमवारी (दि २०) ७१२ कोटी रुपयांच्या विकासकामांबरोबर तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या भव्यदिव्य इमारतीचे उदघाटन होत असताना एखाद्या दूरदृष्टी आणि भव्यदिव्य सोहळ्याचा अनुभव प्रथमच आला असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी येथे व्यक्त केले. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नूतन इमारतीचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, सहकार महर्षी माऊली दाभाडे, पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक बबनराव भेगडे,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, माजी नगराध्यक्ष अंजलीराजे दाभाडे,माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे, यादवेंद्र खळदे आणि श्रीमंत सत्यशीलराजे दाभाडे, वृषालीराजे दाभाडे, दिव्यलेखाराजे दाभाडे
आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.


विकासकामांच्या निधी मंजुरीसाठी काढण्यात येणाऱ्या जीआर पैकी सर्वाधिक जीआर मावळ तालुक्यातील कामांसाठी काढण्यात आले आहेत. त्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी नेटाने केलेला पाठपुरावा, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे त्यांना मोठे पाठबळ आहे. असेही केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले.
Vadgaon Maval: डोणे गावात वडगाव मावळ पोलिसांची अवैध हातभट्टी कारवाई, महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
कृषिमंत्री दत्ता मामा भरणे म्हणाले, की मावळची जनता नशीबवान आहे. त्यांना सुनील शेळके सारखा आमदार मिळाला आहे. त्यांच्या कामाची पद्धत आणि तळमळ पाहाता राज्याच्या तिजोरीची चावी ज्यांच्या हातात आहे, त्या उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी देखील मावळच्या विकासाच्या प्रस्तावांना प्राधान्याने मंजूर करण्यासाठी मंत्रीमंडळातील सहकार्यांना सांगितले आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीसारखी राज्यात इतर कुठेही इमारत नाही. गोरगरिबांची कामे केली, की जनता पाठीशी खंबीरपणे असते, याचा प्रत्यय आज आला. तालुक्यातील क्रीडा संकुल प्रस्ताव लवकरच मंजूर होईल, असेही भरणे यांनी सांगितले.
मावळ तालुक्याला विकासाबाबत राज्यातील एक नम्बरचे करण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना साद घातली. ते म्हणाले की राजकारण बाजूला ठेवून जर येत्या निवडणुकीसाठी बाळा भेगडे यांनी टाळी दिली, तर हे शक्य आहे. त्यावर आपल्या भाषणात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपण दोन्ही हात देऊ असे म्हटले. तालुक्यातील निवडणुका बिनविरोध करू. निवडणुकीवर होणारा खर्च टाळून महिलांना तर विमान प्रवास घडवू पण पुरुष कार्यकर्त्यांनाही विमानाने देशातच नाही पण परदेशातही नेऊ. बाळा भेगडे यांच्या या जाहीर भूमिकेमुळे मावळ तालुक्यातील आगामी निवडणुकांबाबत असलेली संघर्षपूर्ण राजकीय समीकरणे बदलल्यास राज्यात एक नवा मावळ पॅटर्न प्रथमच इतिहास घडवेल, असे मत काही राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केले.
यावेळी सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.



















