मावळ ऑनलाईन — आगामी दहीहंडी व गणेशोत्सवाच्या (DJ-free procession)पार्श्वभूमीवर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने सोमवारी (दि. 21 जुलै) सायंकाळी 6 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी डीजे मुक्त मिरवणुकीला मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
या बैठकीस परिसरातील सर्व गणेश मंडळांचे व दहीहंडी उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी तसेच शांतता कमिटी सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, पोलीस पाटील यांची उपस्थिती होती.
Dehugaon:देहूत श्री संत तुकाराम अन्नदान मंडळाने केले खिचडी वाटप
या बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करत स्पष्ट सूचना दिल्या की, उत्सव काळात डीजेचा वापर टाळावा तसेच मिरवणूक शांततेत आणि डीजेमुक्त स्वरूपात पार पडावी. यावेळी शासनाने दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले.
शांतता कमिटीचे सदस्य शांताराम बापू नरवडे आणि सुदवडी गावचे पोलीस पाटील प्रशांत वाळुंजकर यांनी आपल्या मनोगतातून उत्सव साजरा करताना सामाजिक जबाबदारी जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या या विचारांना अनेक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या बैठकीस 40 ते 50 गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. डीजेमुक्त उत्सव साजरा करण्याच्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले असून, उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मंडळांच्या सहकार्याचे आश्वासनही देण्यात आले.