मावळ ऑनलाईन –छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत(Vadgaon Maval) शासनाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मावळ तालुक्यातही विविध उपक्रम राबवून सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म दिवस (१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (२ ऑक्टोबर) या कालावधीत महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्यासाठी सेवा पंधरवडा राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या कालावधीत राबविण्यात येणारे उपक्रम हे विशेष मोहिमेच्या स्वरूपात राबविले जाणार आहेत. त्यामुळे मावळ तालुक्यातील नागरिकांनी सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार देशमुख यांनी केले.
Pune: पंडित रामदास पळसुले यांना स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार
Talegaon Dabhade: सर्वगुणसंपन्न विद्यार्थी तयार करण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे- रामदास काकडे
यामध्ये पहिल्या टप्प्यात १७ ते २२ सप्टेंबर या कालावधीत पाणंद/शिवार रस्तेविषयक मोहीम राबविण्यात येणार आहे. यात पाणंद रस्त्यांना क्रमांक देणे, गाव नकाशावर रस्ते चिन्हांकित करणे, निस्तारपत्रक व अर्जामध्ये रस्त्यांची नोंद करणे, संमतिपत्र घेऊन शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देणे, रस्ता अदालत आयोजित करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे,शेत रस्त्यांची मोजणी आणि सीमांकन करणे आदी उपक्रमांचा समावेश आहे.
दुसऱ्या टप्प्यात २३ ते २७ सप्टेंबरदरम्यान सर्वांसाठी घरे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये घरे बांधण्यासाठी शासकीय जमिनींचा कब्जा हक्काने वाटप, शासकीय जमिनींवरील अतिक्रमणाचे नियमितीकरण, विकास आराखड्याशी सुसंगत जमिनीवरील अतिक्रमण नियमित करणे, आरक्षण बदलाचे प्रस्ताव सादर करणे तसेच पात्र लाभार्थ्यांना जमिनींचे पट्टे वाटप आदी कार्यवाही केली जाणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या खाळात स्थानिक गरजा व भौगोलिक परिस्थितीनुसार नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.