मावळ तालुक्यात शहर, ग्रामीण भागातील अनेक मंदिरांमध्ये (Vadgaon Maval)सध्या पहाटेचा काकड आरती सोहळा सुरु आहे. कोजागिरी पोर्णिमा झाल्यानंतर अश्विन कृ प्रतिपदेपासून काकडा आरती उत्सव चालु होतो. सुमारे एक महिना दररोज पहाटे देवाला व स्वतःला जागवण्यासाठी भाविकजण मंदिरात जाऊन भजन मालिकामधील काकडा आरती भजन घेतले जातात.
काकड आरतीची परंपरा आणि महत्व –
वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला प्रचंड महत्व आहे.फार पूर्वीपासून हि परंपरा चालत आली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वच मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर स्वर निनादत असतो. कोजागरी पौणिमेपासून या काकड आरतीला सुरुवात होते आणि त्रिपुरारी पौर्णिमेर्पत काकड आरतीचा अखंड गजर सुरू असतो. मावळ तालुक्यातही अनेक गावांमध्ये ही परंपरा अखंडपणे सुरू आहे.
Talegaon Dabhade: तळेगावातील सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न!
Pune : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रामटेकडी येथे फटाके फोडण्यावरून हाणामारी; एकाचा मृत्यू, एक आरोपी अटक

वारकरी संप्रदायात काकड आरतीची मोठी परंपरा आहे आषाढ शु एकादशी (देवशयनी) ते अश्विन शु पौर्णिमा (कोजागिरी) पर्यंतचा कालावधी चातुर्मास समजला जातो या चातुर्मासाच्या कालावधीत श्री पांडुरंग निद्रिस्त असतात अश्विन कृ प्रतिपदेपासून कार्तिक स्नानास प्रारंभ होतो. पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकरी भाविक भक्तांना पांडुरंगाला काकड आरती अभंगाच्या माध्यमातून जागे करावे लागते.
मावळ तालुका हा संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका आहे. मावळ तालुक्याला वारकरी संस्कृतीचा मोठा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे आश्विन महिन्यात महिनाभर चालणाऱ्या काकड आरतीचा गजर सध्या तालुक्यात ऐकायला मिळत आहे. बहुतांश सर्वच ठिकाणच्या विठ्ठल मंदिरांमध्ये कोजागिरी पोर्णिमेनंतर काकड आरतीला सुरुवात होते. गावागावातील सार्वजनिक मंडळे, काकडा आरती सोहळा समिती, भजनी मंडळांसह गावांमधील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांच्या पुढाकाराने काकडा आरतीचे नियोजन करण्यात येते.
मावळ तालुक्यातील प्रत्येक गावातील मंदिरात पहाटेपासूनच काकड आरती भजनास प्रारंभ होत असून संपूर्ण गावातील आबालवृद्ध काकडआरतीसाठी मंदिरात उपस्थित राहतात. असा सोहळा महिना सव्वा महिना चालतो. गावोगावच्या मंदिरातील श्री पांडुरंगाला ‘ उठा पांडुरंगा आता, दर्शन द्या सकळा l अशा आर्त हाकेने पांडुरंगाला जागे करून पंचामृत, शुद्ध पाण्याने स्नान घालून दररोज पोशाख परिधान केला जातो. हार-तुरे घातले जातात व भक्तीभावाने पूजा केली जाते.
मंदिर व मंदिरपरिसरात रांगोळी, आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा व सजावट केली जाते. लहानांपासून तर थोरापर्यंत बंधू -भगिनी भाविक सर्व मंडळी उपस्थित असतात. काकड आरती निमित्त पहाटे चार वाजे पासून मंदिरात काकडा जागर केला जातो, विणेकरी, टाळकरी, मृदंगमनी अतिशय उत्साहाने या सोहळ्यात सहभागी होतात.
रोज मंदिरामध्ये मंगलाचरणे, काकड आरतीचे अभंग, भुपाळ्या, वासुदेव, जोगी, आंधळे पांगुळ, मुका बहिरा, गौळणी, विनवणीचे अभंग, उपसंहार व आरत्या, प्रार्थना अशा पद्धतीने वारकरी, माता-भगिनी हरिनाम गाऊन तीर्थप्रसाद घेऊन घरी परततात..



















