मावळ ऑनलाईन –पर्यावरण संतुलन जपण्यासाठी मावळ तालुक्यात (Vadgaon Maval)आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. सह्याद्री देवराई संस्था आणि पुणे उपवनसंरक्षक कार्यालय (पुणे विभाग) यांच्यातील करारावर आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.
या कराराअंतर्गत मावळ तालुक्यातील सोमाटणे, गहुंजे आणि भंडारा डोंगर परिसरातील विदेशी जंगली वृक्ष काढून टाकले जाणार असून त्यांच्या जागी भारतीय स्थानिक प्रजातींची वृक्षलागवड केली जाणार आहे.
Gauri Avahan: गौरी आवाहन स्थापनेसाठी रविवार, ३१ ऑगस्ट रोजी ‘हे’ आहेत विशेष शुभमुहूर्त
Chakan: इंस्टाग्रामवरील ओळखीनंतर घरात शिरून विवाहितेवर बलात्कार;पोलिसावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

का काढले जाणार आहेत विदेशी वृक्ष?
गेल्या काही दशकांत रानात मोठ्या प्रमाणावर विदेशी जातींची झाडे (जसे की सबबाबूल, ग्लिरिसीडिया इ.) वाढली आहेत. या झाडांमुळे स्थानिक प्रजातींचा नायनाट होतो, पाणी शोषून घेण्याची क्षमता असंतुलित होते आणि जैवविविधतेला धोका निर्माण होतो. यामुळे मातीची धूप, पाण्याची टंचाई आणि पक्षी-प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम होतो.
स्थानिक प्रजातींची लागवडीचे फायदे
या उपक्रमाअंतर्गत पिंपळ, वड, उंबर, कडुलिंब, आवळा, जांभूळ, आंबा यांसारख्या भारतीय प्रजातींची लागवड केली जाणार आहे. या झाडांमुळे –
- पक्षी व प्राणी यांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध होईल.
- जमिनीची पाणी-साठवणक्षमता वाढेल.
- मातीची धूप कमी होईल.
- हवेतील प्रदूषण शोषून घेण्याची क्षमता वाढेल.
- स्थानिक जैवविविधता पुनर्संचयित होईल.
स्वाक्षरी प्रसंगी सह्याद्री देवराई संस्थेचे संस्थापक व सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे आणि पुणे उपवनसंरक्षक (उपविभाग) महादेव मोहिते उपस्थित होते.
आमदार सुनील शेळके यांनी सांगितले, “भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हिरवेगार डोंगर जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. स्थानिक प्रजातींच्या झाडांच्या लागवडीमुळे मावळातील जैवविविधतेला नवी ऊर्जा मिळेल.”
नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा
हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, शाळा, महाविद्यालये व स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. स्थानिकांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला, तर मावळातील हिरवाई पुन्हा दाट होईल आणि पर्यावरणाचा समतोल दीर्घकाळ राखला जाईल.