अजित फाऊंडेशनच्या चिमुकल्यांनी देखाव्याद्वारे केली मागणी
मावळ ऑनलाईन – कोविडपूर्वी पुणे–तळेगाव लोकल रेल्वे नियमितपणे ( Talegaon-Pune Local ) धावायची, पण गेल्या ५ वर्षांपासून दुपारी १२ ते ४ या वेळेत लोकल बंद असल्याने तळेगावकरांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे. चाकरमानी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना या गैरसोयीचा मोठा फटका बसतोय. रस्त्यावरील प्रचंड वाहतूक कोंडी, टोल नाक्यावरील रांगा आणि उबर-ओला किंवा पीएमटीच्या वाढत्या खर्चामुळे पुण्याचा प्रवास आता दीड तासांचा त्रासदायक अनुभव बनलाय. यामुळे वेळ आणि पैसा आणि रोजच्या तणावातही भर पडत आहे.
Rashi Bhavishya 28 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
नागरिक, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी वारंवार रेल्वे मंत्रालयाला निवेदनं दिली; मात्र आजवर कुठलाही ठोस निर्णय नाही. याच ज्वलंत प्रश्नाला आवाज देण्यासाठी अजित फाऊंडेशनच्या चिमुकल्यांनी यंदाच्या गणेशोत्सवात अनोखा देखावा साकारला आहे.
Dagdusheth Ganapati : दगडूशेठ’ गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरती
तळेगाव रेल्वे स्टेशनची प्रतिकृती, धावती लोकल, प्लॅटफॉर्म आणि लक्षवेधी ( Talegaon-Pune Local ) फलकांद्वारे त्यांनी बाप्पाकडे आणि रेल्वे प्रशासनाकडे आपलं साकडं घातलं आहे –
१) आपले बाप्पा आलेत, आता दुपारची लोकल कधी येणार?
२) बाप्पा, वेळेवर पोहोचण्यासाठी लोकल हवीच!
३) लोकल फक्त प्रवास नाही, तर तळेगावच्या विकासाचा आधार आहे!
४) जनतेची मागणी सततची, पण निर्णय अजून बाकी!
५) तळेगावशिवाय पुण्याची लोकल सेवा अपूर्ण!”
६) तळेगाव–पुणे रस्त्यावरचा प्रवास: १ तास आणि एक त्रास.
७) वेळ वाचवा, लोकल चालवा!
८) पुढील स्टेशन तळेगाव… पण दुपारची लोकल कधी?
या देखाव्याद्वारे चिमुकल्यांनी केवळ रेल्वे प्रशासनाचं लक्ष वेधलं नाही, तर लोकशाहीतील संविधानिक हक्काची जाणीव मुलांमध्ये रुजवली आहे. (Talegaon-Pune Local) हा देखावा म्हणजे तळेगावकरांच्या सामूहिक संघर्षाचा आणि भावनांचा आवाज आहे – जो गणपती बाप्पाच्या चरणी आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा पण प्रभावी प्रयत्न आहे.अजित फाऊंडेशनच्या चिमुकल्यांनी मागणी केली आहे – आता प्रशासन कधी ऐकणार? या हक्काच्या मागणीत तुम्हीही सहभागी व्हा!