मावळ ऑनलाईन –मावळ परिसरातील सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या (Talegaon Dabhade)अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे -मावळ शाखेला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व जगप्रसिद्ध वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या जन्म शताब्दी वर्षाचे औचित्य साधून येत्या ९ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत मावळ विभागात प्रथमच वगसम्राट दादू इंदुरीकर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या एकांकिका स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातील नाट्यकर्मींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, प्रथम येणाऱ्या २५ नाट्यसंघाचे प्रवेश नक्की झाले आहेत. येत्या ९, १० व ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:३० पासून रात्री ९:३० वाजेपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचे उदघाटन दि ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता मावळचे आमदार सुनील शेळके आणि तळेगावच्या नाट्य चळवळीत महत्वाचे योगदान देणारे कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष (प्रशासन) नरेंद्र गडेकर, ज्येष्ठ लोकसाहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे आणि एकांकिका स्पर्धेचे प्रायोजक प्रगतीशील शेतकरी सुनील जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Talegaon Dabhade: गोल्डन रोटरी तर्फे प्राथमिक शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम
Uddhav Thackeray: शिवसेनेचे राजकारण सत्तेसाठी नाही – उद्धव ठाकरे
या पत्रकार परिषदेला नाट्य परिषदेच्या उपाध्यक्षा डॉ अपर्णा महाजन, कार्यवाह विश्वास देशपांडे, सचिव संजय वाडेकर, खजिनदार नितीन शहा,सुकाणू समितीचे विदुर महाजन आदी उपस्थित होते.
एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण दि १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता कै.डॉ.शं.वा. परांजपे नाट्यसंकुल, कलापिनी सांस्कृतिक केंद्र तळेगाव दाभाडे येथे प्रसिद्ध नाट्य निर्माते व अखिल भारतीय मराठी नाट्य परीषदेच्या मध्यवर्ती शाखेचे विश्वस्त अशोक हांडे व अखिल भारतीय मराठी नाट्य परीषदेच्या मध्यवर्ती शाखेचे विश्वस्त नाट्य अभिनेते मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा उपाध्यक्ष (प्रशासन) भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते व नियामक मंडळ सदस्य सविता मालपेकर (गाढवाचे लग्न फेम) आणि डॉ. मीनल कुलकर्णी (संस्थापिका, सृजन नृत्यालय व नृत्य अभ्यासक) यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. दरम्यान, पारितोषिक वितरण समारंभाआधी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्या एकांकिकेचा प्रयोग सादर होणार आहे.
सोमवारी दि ६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखा-मावळ व सेवाधाम मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उगवला चंद्र पुनवेचा’ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सेवाधाम ट्रस्ट मोफत वाचनालय व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखा-मावळचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी केले आहे.
या दोन्ही कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही असे संयोजकांकडून सांगण्यात आले आहे.