मावळ ऑनलाईन – “कलाकार नि रसिकही माझा, दोघेही तितकेच गुणी फळास येते इथे साधना, सूर उजळती नभांगणी ” या काव्यपंक्तींचा प्रत्यय देणारी शब्द, सूर,( Talegaon Dabhade)तालाने सजलेली दिवाळी पहाट कलापिनी सांस्कृतिक केंद्रात रसिकांनी अनुभवली.
सुरांच्या संगतीने कलेचा आनंद घेत दिवाळी साजरी करण्यासाठी, कलापिनी आणि हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “सूर उजळती नभांगणी” या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिवाळी पहाटचे हे २९ वे वर्ष होते. कलापिनीच्या गुणवंत कलाकारांनी एकापेक्षा एक सुरेल गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे उतरोत्तर कार्यक्रम रंगत गेला.
हिंद विजय पतसंस्थेचे संस्थापक अॅड रविंद्र दाभाडे, कैलास भेगडे, पंढरीनाथ दाभाडे, राजेश सरोदे, दत्तात्रय कांजळकर, सुधाकर देशमुख व अन्य पदाधिकारी, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या मावळ शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कष्ट घेऊन गुणवत्तापूर्ण कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांचे अॅड रविंद्र दाभाडे यांनी विशेष कौतुक केले. यावेळी संवादिनी वादक सतीश वैद्य आणि पं. विनोदभूषण आल्पे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, कार्याध्यक्षा अंजली सहस्रबुद्धे, डॉ अनंत परांजपे, अशोक बकरे, विनायक भालेराव, श्रीशैल गद्रे, लीना परगी, सुजित मळ्ळी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
Talegaon Dabhade: संध्यासूरांत न्हाली ‘इंद्रायणी’ ची दिवाळी
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस यंदा दिवाळी साजरी करणार नाही – शरद पवारांची घोषणा
लक्ष्मीची स्तुती करणाऱ्या श्लोक आणि स्तोत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर श्रुती रामदासी यांनी राग अहिरभैरव आणि तराणा सादर केला. पं. विनोदभूषण आल्पे यांनी ‘ज्ञानियांचा राजा’ हा अभंग सादर केला. गणेश देवी स्तुती हे नृत्य सिद्धी शहा, अंकिता कुचेकर, पूर्वा बवले, शांभवी जाधव, अवनी भुते, विधी जायगुडे, मैत्रेयी कोल्हापुरे यांनी सादर केले. स्वरदा रामतीर्थकर यांनी सादर केलेल्या ‘युवती मना’ या नाट्यगीताने रसिकांची वाहवा मिळवली. माणिक वर्मा मेडले आणि बालगीत मेडले सादर करून कलाकारांनी रसिकांना पुन:प्रत्ययाचा आंनंद दिला. संगीता देशप्रभू, निशा अभ्यंकर, मेधा रानडे यांनी गीते सादर केली. तेजस जोशी आणि अवनी परांजपे यांनी नाट्यगीते सादर केली. श्रीनिवास खळे यांच्या जन्म शताब्दी वर्षांनिमित्त अभंग मेडले सादर करण्यात आला. धनश्री शिंदे, देवयानी लेले, कीर्ती घाणेकर, जान्हवी पटवर्धन, मैथिली देशपांडे यांनी अभंग रचना सादर केल्या.
मध्यंतरा नंतर प्रणव केसकर, अनिकेत जोशी, सुमित वाजपे, गोविंद राठोड यांच्या गणाने बहार आणली. लीना परगी यांनी शतकांच्या यज्ञातून हे गीत सादर केले. राजश्री धोंगडे यांची कथक जुगलबंदी, कीर्ती ढेंबे यांचे फ्युजन नृत्य, कुमारभवनची दिन दिन दिवाळी विशेष लक्षवेधक ठरली. माझी पंढरीची माय, आई तुज देऊळ, रंगपूजा या गाण्यांनी वन्स मोअर मिळवला. सर्वात्मका सर्वेश्वरा या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.
विनायक लिमये, प्रदीप जोशी (संवादिनी), मंगेश राजहंस, विनायक कुडाळकर, अनिरुद्ध जोशी (तबला), योगीराज राजहंस (तालवाद्य), राजेश झिरपे (सिंथेसायझर) यांनी साथसंगत केली. डॉ. विनया केसकर, विजय कुलकर्णी आणि हेमंत झेंडे यांनी सूत्रसंचालन केले.
कलापिनी महिला मंच, स्वास्थ्ययोगाच्या सदस्यांनी आणि कलापिनीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली. सुमेर नंदेश्वर यांनी ध्वनी संयोजन केले. विराज सवाई, चेतन पंडित, प्रतिक मेहता, चेतन शहा, श्रीपाद बुरसे, रामचंद्र रानडे आदींनी संयोजन केले.
