नगर परिषद शिक्षक दिन सोहळा उत्साहात साजरा
मावळ ऑनलाईन – शिक्षकांचे कार्य हे समाजघडणीसाठी (Talegaon Dabhade)अनमोल आहे. वंचित घटकातील मुलांना शिक्षण देणे हे पुण्याचे काम आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व उज्ज्वल घडते. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा त्यांच्या कार्याविषयी व्यक्त केलेली खरी कृतज्ञता आहे, असे प्रतिपादन नगरपरिषद मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले.
नगर परिषद सभागृहात (दि.१०) शिक्षक दिन समारंभाचे अध्यक्षस्थान सरनाईक यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विचारवंत संजय आवटे, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे, उपमुख्याधिकारी ममता राठोड, परिविक्षाधीन मुख्याधिकारी विशाल शितोळे, लेखापाल जयश्री सायखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Tourism development of Maval : लोणावळा स्काय वॉक प्रकल्पाबाबत बैठकांचे सत्र सुरू – प्रकल्प सुरू करण्याबाबत वेगवान हालचाली
Seva Gaurav Award : ज्योतिर्भास्कर उमेश स्वामी यांना ” सेवा गौरव” पुरस्कार


प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे यांनी शिक्षकांच्या अध्यापनातून झालेल्या समाजाभिमुख योगदानाचा गौरव केला. तर काही शिक्षकांनी मनोगत व्यक्त करताना प्रशासनाकडून मिळालेल्या सहकार्यामुळे आव्हाने पार करण्यास मदत झाल्याचे सांगितले.
मुख्याधिकारी सरनाईक यांनी नगर परिषदेच्या कला-कौशल्य विकास उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची ग्वाही दिली. त्यांनी शिक्षकांना उद्देशून “आदर्श विद्यार्थी घडवा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असे आश्वासन दिले.
समारंभात कला व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २० मुख्याध्यापक व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
संजय आवटे यांनी शिक्षकांना आवाहन केले की, “विद्यार्थ्यांशी सतत संवाद साधा, त्यांना आनंदी राहायला शिकवा. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन खरा भारत त्यांच्या समोर मांडा आणि सुजाण पिढी घडवा.”
“आम्हाला शिक्षकच व्हायचंय” : बालसभेत ठराव
थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील प्राथमिक शाळा क्र.१ येथे भरलेल्या बालसभेत विद्यार्थ्यांनी डॉक्टर-इंजिनिअर नव्हे, तर “आम्हाला शिक्षकच व्हायचंय” असा ठाम निर्धार व्यक्त केला. हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
आठवीतील विद्यार्थ्यांनी दिवसभर अध्यापन करून शिक्षकपदाचा अनुभव घेतला. समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेला छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा फ्रेम भेट दिली. खाऊच्या पैशातून जमा झालेल्या निधीतून सर्व शिक्षकांना पेन भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन वर्गशिक्षक रवींद्र बच्चे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या भाषणातून उमटलेली भावना ठळक होती – “आम्हाला शिक्षकच व्हायचंय!”