डॉ. सुनील देवधर यांच्या व्याख्यानातून चित्रपट गीतांचा साहित्यिक व सांस्कृतिक प्रवास उलगडला
मावळ ऑनलाईन –हिंदी चित्रपट दिग्दर्शकांनी(Talegaon Dabhade) एक संपूर्ण पिढी समृद्ध करत सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. “दिल की उम्मीदों का हौसला तो देखो, इंतजार उसका है जिसको अहसास तक नहीं…” अशा शब्दांत शायरीचा भावार्थ उलगडणारे गीतकार गुलजार आणि इतर कवी-लेखक यांनी हिंदी चित्रपट गीतांना एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे, असे प्रतिपादन आकाशवाणी पुणे केंद्राचे निवृत्त सहाय्यक संचालक डॉ. सुनील केशव देवधर यांनी केले.
ते हिंदी विभागाच्या वतीने आयोजित “हिंदी फ़िल्मी गीत : साहित्य और संस्कृति की कसौटी पर” या विषयावरील विशेष व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
Rotary Club of Maval : रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे विद्यार्थ्यांना ‘आयडल स्टडी ॲप’चे मोफत वाटप
Madhav Patil: विधानसभा उपाध्यक्षांचा अवमान केल्याबद्दल पालिका आयुक्तांनी माफी मागावी आणि त्यांचे निलंबन करावे — माधव पाटील
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, हिंदी विभागप्रमुख डॉ. मधुकर देशमुख आणि प्रा. राजेंद्र आठवले उपस्थित होते.

डॉ. देवधर यांनी आपल्या “बड़े अनमोल हैं गीतों के बोल” या पुस्तकातील उदाहरणे देत हिंदी चित्रपट गीतांतील भावनात्मक गूढता, काव्यगुण, भाषिक सौंदर्य आणि सांस्कृतिक संदर्भ यांचे सखोल विश्लेषण केले. राष्ट्रगीत, गझल, प्रेमगीत यांसारख्या गीतप्रकारांचे त्यांनी लालित्यपूर्ण भाषेत विवेचन करत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
“चित्रपट गीतं म्हणजे भावनांचा सर्जनशील आविष्कार आहे. त्यामधून लेखक, कवी, संगीतकार आणि दिग्दर्शक यांचा हृदयाशी साधलेला संवाद प्रकटतो. विद्यार्थ्यांनी या गीतांचा सखोल अभ्यास करावा,” असेही त्यांनी नमूद केले.
श्रोत्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. मलघे म्हणाले, “पूर्वीची हिंदी फ़िल्मी गीते ही केवळ मनोरंजनासाठी नव्हती, तर ती आपल्या समाजाच्या भावना, मूल्ये आणि संस्कृतीचे प्रतीक होती. आजच्या उडत्या चालींच्या गाण्यांनीही सामाजिक भान जपायला हवे.” सध्या अनेक विद्यार्थी या गीतांवर संशोधन करत असून, अशा अभ्यासामुळे त्यांचा साहित्यिक दृष्टिकोन समृद्ध होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ. मधुकर देशमुख यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. राजेंद्र आठवले यांनी केले. कार्यक्रमाला कला आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. विजयकुमार खंदारे, प्रा. डॉ. संदीप कांबळे, प्रा. मिलिंद खांदवे, प्रा. दीपक मोरे यांनी विशेष सहकार्य केले.