मावळ ऑनलाईन – ऐसें छत्र मायेचे पांघरूनी, ऊन वारा की पावसाच्या सरी | झाकल्या अंबरी | डोळे मिटून घेतले जरी, विठुरायाची छबी दिसे अंतरी खरी || या भावनांना उराशी बाळगून पालखीसोबत मजल दरमजल करत पंढरपुरकडे पायी निघालेल्या वारकरी मंडळींना ऊन, वारा अन पावसाच्या तडाख्यापासून दिलासा मिळावा यासाठी येथील पुणे पीपल्स बँकेच्या शाखेतर्फे ताडपत्री तंबू भेट देण्यात आले आहेत. ज्येष्ठ संचालक बबनराव भेगडे यांच्या हस्ते वारकऱ्यांना त्याचे वाटप तळेगाव दाभाडे येथे करण्यात आले.
पुणे पीपल्स बँकेच्या वतीने श्रीक्षेत्र पंढरपूर पायी वारी करणाऱ्या दिंड्यांना ताडपत्रीचे तंबू बँकेचे ज्येष्ठ संचालक बबनराव भेगडे,माजी नगरसेवक संतोष भेगडे,उद्योजक कौस्तुभ भेगडे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी श्री क्षेत्र भामचंद्र दिंडीचे प्रमुख हभप ज्ञानेश्वर मराठे, हभप अण्णासाहेब मराठे, तळेगाव दाभाडे दिंडीचे प्रमुख हभप अण्णासाहेब दाभाडे,विश्वस्त हभप बाळकृष्ण आरडे, हभप जगताप महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना बबनराव भेगडे म्हणाले, सदर ताडपत्रीचे तंबू हे पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना देण्यात येत असून वारकऱ्यांना निश्चितच ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळेल म्हणून प्रदान करण्यात आले आहेत. ताडपत्रीचे तंबू हे श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर पायी दिंडी आणि तळेगाव दाभाडे पायी दिंडी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी देण्यात आले असून याबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.