मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्तपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर गिरीश दापकेकर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विजयकुमार सरनाईक यांच्या पदोन्नतीने रिक्त जागेवर पुणे महानगरपालिकेचे सहायक आयुक्त गिरीश दापकेकर यांची तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी – छापवाले यांनी मंगळवारी (दि४) काढला आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी १८ एप्रिल २०२२ रोजी प्रथम रुजू झालेल्या विजयकुमार सरनाईक यांची २२ एप्रिल २०२३ रोजी सोलापूरच्या जिल्हा प्रशासन अधिकारी पदावर मुदतपूर्व बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी आलेले मुख्याधिकारी (Talegaon Dabhade) एन के पाटील यांची १ डिसेंबर २०२३ मुदतपूर्व बदली झाल्यानंतर सरनाईक यांची ४ डिसेंबर २०२३ रोजी त्याच जागेवर पुनर्नियुक्ती करण्यात आली. त्यास पाटील यांनी मॅटमध्ये आवाहन देत बदलीला स्थगिती मिळविल्याने आठवडाभरात पुन्हा पाटील मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले.
Bajirao Road Murder : धक्कादायक! दिवसाढवळ्या बाजीराव रोडवर तरुणाचा खून
८ जुलै २०२४ मध्ये वादग्रस्त मुख्याधिकारी पाटील यांना शासनाने निलंबित केल्यानंतर दोन महिन्यांनी ९ सप्टेंबर २०२४ रोजी सरनाईक यांनी पदभार स्वीकारला होता. सरनाईक यांना वारंवार बदल्याना सामोरे जावे लागले असले तरी गेल्या १४ महिन्यांच्या कारकिर्दीत त्यांनी प्रशासनाची घडी बसविण्याचा प्रयत्न केला. नुकतेच लोकार्पण झालेली तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) नगरपरिषदेची भव्य प्रशासकीय इमारत तसेच श्री शिव शंभू स्मारक उभारण्याकामी सरनाईक यांचे मोलाचे योगदान लाभले.
नव्याने रुजू होणारे गिरीश दापकेकर यांनी यापूर्वी पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच पुणे महापालिकेच्या औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त म्हणून कारभार पाहिला आहे. घनकचरा व्यवस्थापनच्या राज्यस्तरीय राज्य सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही दापकेकर यांनी काम पहिले आहे.



















