मावळ ऑनलाईन –राजकारणात कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळचे आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे या ‘मामा-भाच्या’ जोडीने अखेर एकाच मंचावर ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ची झलक दाखवली. तळेगाव नगरपरिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने हे दृश्य पाहायला मिळाले.
मावळच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी बाळा भेगडे यांना केले, त्यावर भेगडेंनीही सकारात्मक प्रतिसाद देत तालुक्याच्या एकत्रित विकासाची तयारी दर्शवली. यामुळे गेल्या काही वर्षांपासून राजकीय मतभेदांतून आलेल्या त्यांच्या नात्यात नव्या सलोख्याची झलक दिसली.
मागील विधानसभा निवडणुकीत भेगडे यांनी भाजप नेते असूनही महायुतीच्या निर्णयाविरुद्ध जाऊन सुनील शेळके यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्यामुळे त्यांच्या नात्यातील तणाव विकोपाला गेला होता. मात्र, आता दोघांच्या या जवळीकीमुळे मावळ तालुक्यातील राजकीय समीकरणे नव्या दिशेने वळण्याची चिन्हे दिसत आहेत.
Defence Sector: रक्षा क्षेत्रातील कामगारांची दिवाळी काली….
या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर मांडेकर, अमित गोरखे, माजी आमदार विलास लांडे, रूपलेखा ढोरे, माउली दाभाडे, बबनराव भेगडे, शंकरराव शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार शेळके म्हणाले, “राजकारण बाजूला ठेवून जर मावळच्या विकासासाठी बाळा भेगडे यांनी टाळी दिली, तर तालुक्याचा आणखी वेगाने विकास साधता येईल.” त्यावर प्रत्युत्तर देताना भेगडे म्हणाले, “तालुक्यातील निवडणुका बिनविरोध करून महिलांना विमान प्रवास घडवू; आणि कार्यकर्त्यांनाही देश-विदेशात नेऊ.”
या कार्यक्रमात तब्बल ७७ कोटी ५४ लाख रुपयांच्या लोकार्पण आणि ६८३ कोटी ६३ लाख रुपयांच्या भूमिपूजन कामांचा शुभारंभ झाला. एकूण ७६२ कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण झाल्याचे केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी सांगितले.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “मावळला सुनील शेळकेसारखा कामसू आमदार मिळाला, हे या मतदारसंघाचे भाग्य आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मावळच्या विकास प्रस्तावांना प्राधान्याने मंजुरी देण्याचे निर्देश दिले आहेत.”
शेवटी आमदार शेळके यांचा वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मावळातील विरोधी राजकीय पक्षांमधील ‘दूर’ आता ‘सूर’ मध्ये बदलल्याचे चित्र लोकांनी अनुभवले.