मावळ ऑनलाईन –पांडवांच्या वनवासाच्या काळात त्यांनी काही काळ घोरावडेश्वर डोंगरावर वास्तव्य केले. जगदंबेचे स्मरण (Talegaon)करत असताना देवीने पांडवांना तिथे दर्शन दिल्याची आख्यायिका सांगितली जाते. तिथेच अमरदेवी मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरात नवरात्रीनिमित्त भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून नित्य पूजा आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
पुण्यापासून २७ किलोमीटर अंतरावर देहूरोड व तळेगाव दरम्यान पुणे -मुंबई राष्ट्रीय महामार्गाशेजारी श्रीक्षेत्र घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला वनराईने नटलेल्या निसर्गरम्य परिसरात श्री अमरदेवी मातेचे सुंदर मंदिर आहे. मावळ तालुक्यात जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे.
त्रिगुणात्मक महाकाली,महासरस्वती प्रत्यक्ष ब्रम्हापिनि ओंकार स्वरूपाच्या अधिष्टीत देवीचे वास्तव्य या ठिकाणी आहे. या देवीला अमरजाई या नावानेही संबोधले जाते. पांडवांच्या चौदा वर्षे वनवासातील काळात काही काळ वास्तव्य घोरावडेश्वर डोंगरावर होते.
अज्ञातवासात असताना व आपल्या जगदंबेचे स्मरण करीत असताना ज्या ठिकाणी ते बसले होते त्या ठिकाणी चमत्कार घडून जवळचीच शिळा दुभंगून साक्षात अष्टभुजा अमरदेवी प्रकटली.देवीचे त्रिगुणात्मक रूप पाहून पांडव अत्यानंदित झाले.देवीने प्रत्यक्ष साक्षात्कार दिल्याने त्यांना पुढील काळ शुभ वाटला. त्यांनी देवीची मनोभावे पूजा करून देवीला आशीर्वाद मागितला. तुम्ही अमर होऊन सुख समृद्धीचा पुढील काळ राहील,असा आशीर्वाद देऊन अंतर्धान पावली.अशी आख्यायिका सांगितली जाते. त्याच ठिकाणी अमरजाई मंदिर असून भाविक भक्त अमरदेवी नावाने संबोधतात.
दर्शनासाठी नवरात्रोत्सवासह दर मंगळवार व शुक्रवारी गर्दी असते. निसर्गाच्या कुशीत असल्याने पर्यटनासाठी येणा-यांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी असते. मंदिराचा गेल्या काही वर्षात जीर्णोद्धार करण्यात आल्याने मंदिर आणखी आकर्षक झाले आहे. मंदिराच्या आवारात श्रीगणेश,राधा कृष्ण मदिर आहे. शेजारी लहानमुलांसाठी उद्यान विकसित केलेले आहे. शेलारवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या श्री.अमरदेवी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तमंडळाच्या सदस्यांच्या माध्यमातून येथील कारभार पाहिला जात असून रवींद्र उर्फ लहू शेलार हे देवस्थानचे अध्यक्ष आहेत.
‘वनवासाच्या काळात पांडवांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या घोरावडेश्वर डोंगराच्या परिसरात अमरदेवी माता एका शिळेतून प्रगट झालेली असून शिळेच्या मागील बाजूस मोठी गुहा आहे.त्यामागे पाणी असून त्यापुढे जाण्याचे धाडस केलेले नाही. शेलारवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून सुमारे ४२ वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे.’वसंत जोशी पुजारी श्रीअमरदेवी मंदिर, शेलारवाडी, देहूरोड.
Eka Aticha Sansar: एका अटीचा संसारचा रौप्य महोत्सवी प्रयोग संपन्न
Pune: कोंढव्यातील येवलेवाडीत नायजेरियन नागरिकाकडून मेफेड्रोन जप्त; गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई