मावळ ऑनलाईन – टाकवे बुद्रुक येथे पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनजवळ खेळत असलेल्या मुलांवरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार मारामारी झाली. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गंभीर स्वरूपाच्या फिर्यादी देण्यात आल्या असून वडगाव मावळ पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी नोंदवून दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले आहेत.
ही घटना १० जून २०२५ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
पाण्याच्या पाईपवरून वाद, हाणामारीत वृद्धासह महिलांना मारहाण
पहिल्या फिर्यादीप्रमाणे, नामदेव जगन्नाथ मोरे (वय ६५, रा. ननावरे कॉम्प्लेक्स मागे, टाकवे बु) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरासमोर पाण्याच्या पाईप लाईनजवळ आरोपी सोमनाथ पांडुरंग मोरे याची मुले सायकल खेळत होती. त्यामुळे पाईपलाईन तुटण्याची भीती व्यक्त करत त्यांनी मुलांना खेळू नये असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपी सोमनाथ मोरे व त्यांची पत्नी निशा मोरे यांनी त्यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर किसन पांडुरंग मोरे, संदीप पांडुरंग मोरे व त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून जमाव जमवला व नामदेव मोरे यांच्यासह त्यांच्या मुलगा हेमंत, सून योजना, पत्नी सिंधु आणि नातू प्रितम यांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी सोमनाथ मोरे, निशा मोरे, संदीप मोरे, किसन मोरे आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांविरोधात वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
“माझ्या मुलांना शिव्या दिल्या, म्हणून संतापले” – दुसरी बाजू
दरम्यान, याच घटनेनंतर काही वेळातच निशा सोमनाथ मोरे (वय ३०) यांनीही नामदेव मोरे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, नामदेव मोरे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी त्यांच्या मुलांना शिवीगाळ केली आणि समजावण्याचा प्रयत्न करताना त्यांनीच निशा मोरे, पती सोमनाथ आणि अन्य कुटुंबीयांना अपशब्द वापरून मारहाण केली. त्यात सीमा मोरे यांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी नामदेव मोरे, हेमंत मोरे, योजना मोरे, सिंधु मोरे यांच्यासह अन्य सदस्यांविरोधातही स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे.
या दोन्ही प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून दोन्ही बाजूंच्या जबाबांची तपासणी सुरू आहे. घटनेला ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या पाइपलाइनसंदर्भातील किरकोळ वाद कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट होत आहे.
Talegaon Dabhade: तळेगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी १४ प्रभाग तर २८ नगरसेवकांची संरचना निश्चित
या प्रकरणाचा तपास वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार देशमुख व पोलीस हवालदार खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.