मावळ ऑनलाईन –मावळमध्ये माजी आमदार कृष्णराव भेगडे (Sanjay Awate)यांच्या रूपाने प्रगल्भ राजकीय व्यक्तिमत्व होऊन गेले.पंडित नेहरू,यशवंतराव चव्हाण,शरद पवार असोत की कृष्णराव भेगडे यांचा वारसा मुली चालवताहेत. मावळात रामभाऊ म्हाळगी व कृष्णराव भेगडे हे राजकारणातील महारथी होते. त्यांनी राजकारणासाठी राजकारण केले नाही. कृष्णराव भेगडे यांचा शैक्षणिक वारसा आज तरुण पिढी चालवतेय, ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे, असे प्रतिपादन’लोकमत’चे संपादक संजय आवटे यांनी केले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या ऐतिहासिक संस्थेचे माजी अध्यक्ष,माजी आमदार दिवंगत कृष्णराव भेगडे यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि. ११)नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या उद्बोधन सभेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष, संस्थेच्या नियमक मंडळाचे सदस्य
गोरखभाऊ काळोखे होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव तथा प्रकल्प प्रमुख संतोष खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के, सहसचिव नंदकुमार शेलार, प्रकल्प सहप्रमुख सोनबा गोपाळे,दामोदर शिंदे,ज्येष्ठ उद्योजक राजाराम म्हस्के,राजश्री म्हस्के, रवीना आणि रिद्धी म्हस्के उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि कृष्णराव भेगडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत यश मिळवलेल्या २३ विद्यार्थ्यांना मावळ भूषण, शिक्षणमहर्षी कै.कृष्णराव धोंडिबा भेगडे स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Khed Accident: कुंडेश्वर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या पिकअपचा अपघात;आठ महिलांचा मृत्यू, १७ जखमी
Kranti Din : क्रांतिकारक हुतात्मा विष्णू पिंगळे यांना अभिवादन!

मान्यवरांच्या उपस्थितीत एक शिक्षक -एक झाड हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला.यावेळी
ज्येष्ठ संचालक महेशभाई शहा, विनायक अभ्यंकर,सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप पानसरे, बबनराव ढोरे,विविध शाखांचे मुख्याध्यापक,शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक संतोष खांडगे यांनी केले.संतोष खांडगे म्हणाले, कृष्णराव भेगडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत संस्थाहित पाहिले. त्यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन मिळाले. भेगडे साहेबांची उणीव कायमची भासणार आहे.
गोरखभाऊ काळोखे म्हणाले, कृष्णराव भेगडे साहेबांनी आपल्या जीवनामध्ये तळेगावचे परिवर्तन घडविले. त्यांच्या सानिध्यात आल्याने अनेकजण घडले.मी त्याचा साक्षीदार आहे.
संजय आवटे म्हणाले, की खंबीर लोकनेता ही भेगडे साहेबांची ओळख होती. त्यांच्या सकारात्मक विचारांमुळेच आज मावळ तालुका समृद्ध आहे. ते नेहमी तरुण पिढीशी समरस व्हायचे. मावळ सारख्या तालुक्याला विकासाच्या मार्गांवर नेण्याचे काम त्यांनी केले. ते नव्या काळाशी बोलत होते. नव्या काळाची आव्हाने समजून घेतली पाहिजेत, असे कृष्णराव भेगडे यांचे मत होते. त्यांना राजकारणाचा खरा अर्थ कळला होता. महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. त्यांच्याकडूनच नैतिक तेज अंगी आले होते. भेगडे यांनी द्रष्ट्येपणाने काम केले. मानवी समुदाय आहे, तोपर्यंत कृष्णराव भेगडे साहेबांचे विचार कायम राहतील.
कृष्णराव भेगडे यांनी शिक्षणाची गंगा आणली. शिक्षणाच्या माध्यमातून मागास भागाला पुढे आणले. आज शिक्षणाचे खासगीकरण चिंतेची बाब आहे. राजकारणावर सर्वसामान्यांचा अंकुश असला पाहिजे. जातीव्यवस्था नष्ट करून जात धर्माच्या पलीकडे भारताची कल्पना झाली पाहिजे. त्यामुळे सलोखा निर्माण होईल. नव्या पिढीशी बोलले पाहिजे. नव्या पिढीला बोलू दिले पाहिजे. मुलांना हव्या त्या विषयात करिअर करू द्या. त्यांना विचार करायला प्रवृत्त करणे हे शिक्षकांचे काम आहे. त्यांना राजकीय, सामाजिक भान दिले पाहिजे. स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे बघायला शिकवले पाहिजे. विद्यार्थ्यांना बाईकडे माणूस म्हणून बघायला शिकवा, असे आवाहनही संजय आवटे यांनी केले.
सूत्रसंचालन अनिता आगळमे व अनुराधा हुलावळे यांनी केले. सोनबा गोपाळ यांनी आभार मानले.