Team MyPuneCity –सिंहगड रोड परिसरात( Pune Crime News 4 May 2025)नवले हॉस्पिटल ब्रिजजवळ भरदिवसा भरधाव ट्रकने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून मोपेडला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला. ही घटना ३ मे २०२५ रोजी दुपारी १.१५ च्या सुमारास घडली.
यावर सरवर (वय ४५, रा. कोंढवा खुर्द, पुणे) यांनी याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ट्रकचालकाने कात्रजकडून नवले ब्रिजकडे येताना ट्रक भरधाव व हयगयीने चालवून फिर्यादी यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादी जखमी झाले असून, अपघातावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या होंडा अॅक्टीवा गाडीवरील राहुल जगन्नाथ खाटपे (वय ३२, रा. घर नं. १३६, वडगाव बुद्रुक, प्रतिक हॉस्टेलसमोर, सिंहगड कॉलेज रोड) या तरुणास गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.
या अपघातात एकूण चार वाहनांचे नुकसान झाले आहे. आरोपी ट्रकचालकाविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर करत आहेत.
बनावट सीबीआय अधिकाऱ्याचा दावा करून २३ वर्षीय तरुणाची सुमारे ४३ लाखांची फसवणूक
बाणेर परिसरात एका २३ वर्षीय तरुणाची ऑनलाईन माध्यमातून बनावट केंद्रीय तपास संस्था (CBI) व पोलिसांचे प्रतिनिधित्व करून तब्बल ४२ लाख ९५ हजार ६३७ रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी रामनगर, बाणेर येथील २३ वर्षीय युवकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर २०२४ ते ९ सप्टेंबर २०२४ दरम्यान आरोपी मोबाईल धारकाने स्वतःला दिल्ली सीबीआय आणि पोलीस असल्याचे भासवून फिर्यादी यांना फोनवर खोट्या केसेस दाखल झाल्याचा धमकीवजा दावा केला. त्यानंतर विविध कारणांनी त्यांच्याकडून ४२.९५ लाखांहून अधिक रक्कम उकळली.
बाणेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सध्या फरार आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Crime News : व्यवसायाच्या बहाण्याने डॉक्टरची ३० लाखांची फसवणूक
पर्वतीत घरकामासाठी ठेवलेल्या महिलांकडून सव्वाचार लाखांचे दागिने लंपास
पर्वती परिसरातील मित्रमंडळ कॉलनीत राहणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेच्या घरातून घरकामासाठी ठेवलेल्या दोन अनोळखी महिलांनी तब्बल ४ लाख १५ हजार रुपयांचे सोन्या-हिऱ्याचे दागिने चोरी करून पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी पर्वती येथील पीडित महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात ऑनलाईन तक्रार दिली होती. त्यानुसार, २४ नोव्हेंबर २०२४ ते १८ मार्च २०२५ या कालावधीत फिर्यादी महिलेकडून घरकाम करणाऱ्या अनोळखी महिलांनी त्यांच्या संमतीशिवाय घरातील कपाटातून सोन्या-हिऱ्याचे दागिने चोरले.
पर्वती पोलीस ठाण्यात या महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस अंमलदार मरगजे करत आहेत.