Team MyPuneCity –कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेले (Pimpri Chinchwad Crime News 23 April 2025)नाव वापरून बनावट मशीनची विक्री केल्याचा प्रकार मंगळवारी (22 एप्रिल) एमआयडीसी भोसरी येथे उघडकीस आला.
आदम हुसेन बेग (६३, एमआयडीसी भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्दुल्ला नुरल्ला आवटी (२७, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी येथील अब्राहम मशिनरी अँड स्पेअर पार्टस या दुकानाचे मालक अब्दुल्ला आवटी याने त्याच्या दुकानात व्यापाराच्या उद्देशाने क्रॉम्प्टन कंपनीच्या मूळ नावामध्ये बदल करून कॉम्प्टन असे केले. त्या नावाने मशिनरी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी साठा करून विक्रीसाठी ठेवल्या. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आदम बेग यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी कारवाई करत दुकानातून पाच लाख ५६ हजार ७०० रुपये किमतीच्या मशिनरी जप्त केल्या.
————————-
गांजा विक्री प्रकरणी एकास अटक
गांजा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने एका व्यक्तीला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (२२ एप्रिल) दुपारी अजंठानगर, चिंचवड येथे करण्यात आली.
धनंजय शिवाजी देसाई (५२, सांगली) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मितेश यादव यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजंठानगर येथे एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती अमली पदार्थ विक्रीसाठी आला असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी कारवाई करत धनंजय देसाई याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३१ हजार ५०० रुपये किमतीचा ११० ग्रॅम वजनाचा गांजा आणि मोबाईल फोन जप्त केला आहे.
————————
पादचारी तरुणाला विनाकारण मारहाण
रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाला विनाकारण बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (२२ एप्रिल) मध्यरात्री मोरेवस्ती, चिखली येथे घडली.
प्रेम अंबादास मिसाळ (१९, वाघोली, पुणे) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ठिचक्या उर्फ प्रेम देवरे (रा. चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रेम यांचे मामा मोरेवस्ती चिखली येथे राहतात. मंगळवारी मध्यरात्री ते पायी चालत मामाच्या घरी जात होते. त्यावेळी रस्त्यात मद्यपी आरोपीने प्रेम यांना अडवले. तू कुठून आला आहे, असे विचारले. प्रेम यांनी आरोपीला विरोध केला असता आरोपीने प्रेम यांना काचेच्या बाटलीने मारून जखमी केले.
Lonavala Morcha : लोणावळा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा; अमली पदार्थ विक्रीविरोधात नागरिक आक्रमक
———————–
भरधाव वाहनाची एका व्यक्तीसह दोन वाहनांना धडक
भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने दोन कारला धडक दिली. तसेच एका व्यक्तीला धडक दिली. ही घटना सोमवारी (२१ एप्रिल) रात्री दहा वाजता महात्मा फुले नगर, चिंचवड येथे घडली.
धीरज धर्मराज कागे (४०, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साईनाथ अशोक भोसले (२५, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साईनाथ याने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवले. महात्मा फुले नगर येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली स्विफ्ट कार आणि थार कारला धडक देऊन नुकसान केले. तसेच तसेच रस्त्याच्या बाजूला थांबलेले अस्लम खान (चिखली) यांना धडक दिली. अपघात झाल्यानंतर आरोपी साईनाथ पळून गेला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
———————–
अटक करण्याची भीती घालत वृद्ध महिलेची फसवणूक
वृद्ध महिलेला फोन करून अटक करण्याची भीती घालत महिलेकडून पैसे घेत फसवणूक केली. ही घटना २८ आणि २९ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत सांगवी येथे घडली.
याप्रकरणी ७१ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय पाटील, संदीप राव, दीपारनीता मुन्शीकर आणि एक अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी वृद्ध महिलेला फोन केला. फिर्यादी महिलेला अटक करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगत त्यांची फावणूक करण्याचा प्रयत्न केला.
———————-
पॉलिश करण्यासाठी दिलेल्या २९ लाखांच्या दागिन्यांचा अपहार
पॉलिश करण्यासाठी दिलेल्या २९ लाख ९ हजार ३८० रुपये किमतीच्या दागिन्यांचा दुकानातील कामगाराने अपहार केला. ही घटना ३ एप्रिल रोजी चाकण येथे घडली.
शंकर काशीराम पोतदार (चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चाकण येथे सराफी दुकान आहे. दुकानामध्ये शंकर पोतदार हा काम करत होता. शंकर याचा भाऊ ज्ञानेश्वर काशीराम पोतदार याच्याकडे फिर्यादी त्यांच्या दुकानातील दागिने पॉलिश करण्यासाठी देत असत. नेहमीप्रमाणे दागिने पॉलिश करण्यासाठी दिले असता शंकर पोतदार याने एकूण २९ लाख ९ हजार ३८० रुपये किमतीच्या ३५९.५७० ग्रॅम दागिन्यांचा अपहार केला.
—————————
जागेच्या वादातून वृद्धाला चाकूने भोकसले
जागेच्या वादाच्या कारणावरून दोघांनी एका वृद्धाला चाकूने भोकसले. ही घटना सोमवारी (२१ एप्रिल) पहाटे वाघेरे पार्क, पिंपरीगाव येथे घडली.
कानियमपाल शंकरण रवी (६५, पिंपरीगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कानियमपाल यांच्या पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतीक जयराज पिल्ले (३०, देहूरोड) आणि त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतीक आणि फिर्यादी यांचे पती कानियमपाल यांचा जागेच्या मालकीच्या कारणावरून वाद होता. त्यावरून सोमवारी पहाटे दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. प्रतीक याने कानियमपाल यांच्या पाठीत चाकूने भोकसले. तर त्याच्या साथीदाराने कानियमपाल यांच्या पायावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. पोलिसांनी प्रतीक पिल्ले याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
——————————
https://youtu.be/AwU80BMOQnY?si=3TtRnEGghO2RwOZ6