Team MyPuneCity – हॉस्पिटल मध्ये मेडिकल सुरु करण्यासाठी तसेच मेडिकल सुरु केल्यानंतर रुग्णांच्या उपचारासाठी मेडिकल मधून घेतलेल्या औषधांचे पैसे न देता मेडिकल व्यावसायिकाची तब्बल ९५ लाख ११ हजार ३१९ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार पिंपळे गुरव येथे उघडकीस आला आहे. हा प्रकार ७ जानेवारी २०२३ ते ३ मे २०२५ या कालावधीत घडला.
किरण किशोर संचेती (३४, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. मयूर संजय काठोळे, संजय शंकर काठोळे, दिगंबर चंद्रकांत गवळी, बळीराम आनंदराव घोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Indrayani River: इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाविरोधात नागरिकांचे आंदोलन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून डॉ. मयूर काठोळे याने किरण संचेती यांना काठोळे हॉस्पिटल येथे मेडिकल सुरु करण्यासाठी ८० लाख ११ हजार ३१९ रुपये घेतले. त्या पैशांचा डॉ. काठोळे याने वैयक्तिक लाभासाठी वापर केला. त्यानंतर डॉ. काठोळे याने हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी संचेती यांच्या मेडिकल मधून १५ लाख रुपयांची औषधे नेली. त्याचे पैसे संचेती यांना दिले नाहीत. आरोपींनी संचेती यांची एकूण ९५ लाख ११ हजार ३१९ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.