मावळ ऑनलाईन – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ ( Paranjape Vidya Mandir) संचलित ॲड. पू. वा. परांजपे विद्यामंदिरामध्ये १५ ऑक्टोबर २०२५ रोजी अत्याधुनिक संगणक दालनाचे उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मावळ तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक दत्तात्रय कुडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे सचिव संतोष खांडगे होते. यावेळी मंडळाचे सदस्य महेशभाई शहा, सोनबा गोपाळे, विनायक अभ्यंकर, शालेय समिती सदस्य अशोक काळोखे, माजी नगरसेविका नीता काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले. प्रमुख पाहुणे दत्तात्रय कुडे आणि उद्धव चितळे यांच्या माध्यमातून शाळेला सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचे फर्निचर संगणक दालनासाठी प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कुडे म्हणाले, “आजच्या काळात शाळा भौतिक सुविधांनी समृद्ध होत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे यासाठी अनेक सामाजिक संस्था व उद्योजक पुढे येत आहेत. विद्यार्थ्यांनी या संधींचे सोनं करून पालकांचे व शाळेचे नाव उज्ज्वल करावे आणि देशकार्यात सक्रिय सहभाग ( Paranjape Vidya Mandir) घ्यावा.”
अध्यक्षीय मनोगतात सचिव संतोष खांडगे म्हणाले, “पुणे जिल्ह्यातील परांजपे विद्यामंदिर हे उत्कृष्ट नियोजन, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विविध उपक्रमांमुळे आदर्श शाळा म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत आणि सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवावे.”
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका सौ. रेखा भेगडे यांनी केले, तर सूत्रसंचालन सौ. प्रभा काळे यांनी केले. संगणक शिक्षिका कोमल कांबळे, संपत गोडे, दत्तात्रय ठाकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम ( Paranjape Vidya Mandir) घेतले.