धबधब्यांमध्ये पोहणे, सेल्फी, मद्यपान, ध्वनीप्रदूषण यावर बंदी; नियम मोडल्यास कठोर कारवाईचा इशारा
मावळ ऑनलाईन – पावसाळ्याची चाहूल लागताच लोणावळा आणि परिसरातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अपघात, वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या संभाव्य अडचणी लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी ७ जून २०२५ पासून ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रतिबंधात्मक ( Lonavala)आदेश लागू केले आहेत.
Dr. Padmini Karad : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पद्मिनी कराड यांचे निधन
कोणत्या पर्यटनस्थळांना आदेश लागू?
लोणावळा परिसरातील एकवीरा देवी मंदिर, कार्ला लेणी, भाजे लेणी व धबधबा, लोहगड, विसापूर, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट आणि पवना धरण या ठिकाणांना हे आदेश लागू आहेत. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्या शिफारसीवरून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
प्रमुख निर्बंध पुढीलप्रमाणे:
- धबधब्यांमध्ये किंवा जोरात वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, पोहणे कठोरपणे निषिद्ध
- धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे अथवा चित्रीकरण करण्यास मनाई
- नैसर्गिक धबधब्यांजवळ मद्यपान, अनधिकृत मद्यविक्री व सेवनावर बंदी
- सार्वजनिक ठिकाणी कचरा, प्लास्टिक वस्तू, बाटल्या टाकणे निषिद्ध
- महिलांशी असभ्य वर्तन किंवा छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई
- मोठ्या आवाजात गाणी, डीजे वाजविणे, ध्वनीप्रदूषणास मनाई
- धबधबे आणि धरण परिसरात वाहनांना प्रवेशबंदी (फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना परवानगी)
- रस्त्यांवर वाहने अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे पार्क करणे वा बेदरकार वाहन चालवणे निषिद्ध
कायदेशीर कारवाईची तरतूद:
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३च्या कलम २२४ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असून, त्यांना शिक्षा होण्याची ( Lonavala)शक्यता आहे.
प्रशासनाचा हेतू – सुरक्षित पर्यटन व नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण
प्रशासनाच्या या निर्णयामागील मुख्य उद्दिष्टे म्हणजे पर्यटकांचे प्राण वाचवणे, अपघात टाळणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे आहे. स्थानिक पोलिस यंत्रणा व महसूल प्रशासन या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सतर्क असतील.
पर्यटकांसाठी प्रशासनाचा आवाहन:
पर्यटनाच्या आनंदात सुरक्षिततेचे भान ठेवावे, नियमांचे काटेकोर पालन करावे आणि नैसर्गिक सौंदर्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले ( Lonavala) आहे.