मावळ ऑनलाईन (प्रभाकर तुमकर) – मावळचे माजी आमदार, शिक्षणमहर्षी आणि मावळ भूषण या उपाधींचा सार्थ मान मिळवलेले कृष्णराव धोंडिबा भेगडे (वय ८९) यांचे सोमवार (दि. ३० जून २०२५) रोजी रात्री ९ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मावळ तालुक्याने एक दूरदृष्टीचा, संयमी आणि ध्येयवादी नेता गमावला आहे. त्यांच्यावर मंगळवारी (दि. १ जुलै) सकाळी ११ वाजता तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राजकीय जीवनाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून
कृष्णराव भेगडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. संघाच्या विचारसरणीवर आधारित भारतीय जनसंघ पक्षात त्यांनी राजकारणाची कारकीर्द सुरू केली. तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष या पदांवर कार्य करत त्यांनी स्थानिक प्रशासनात विश्वासार्ह नेतृत्व निर्माण केले.
आमदारपदाची दोनदा जबाबदारी
सन १९७२ ते १९७८ व १९७८ ते १९८० या कालखंडात भेगडे यांनी मावळ मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून काम पाहिले. १९७२ साली जनसंघाच्या उमेदवारीवर ते निवडून आले. १९७६ मध्ये एस काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर, १९७८ मध्ये एस काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी पुन्हा विजय मिळवला. यानंतर १९९३ साली ते विधान परिषदेवरही निवडून आले होते. आपल्या संयमी नेतृत्वामुळे आणि कार्यक्षमतेमुळे ते सर्व पक्षीय नेत्यांमध्ये आदराचे स्थान राखून होते.
शिक्षण, आरोग्य व सहकार क्षेत्रात भरीव योगदान
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शिक्षण प्रसाराचा वसा घेतला. इंद्रायणी विद्या मंदिर आणि तळेगाव जनरल हॉस्पिटल या संस्था त्यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथावर गेल्या. ते औद्योगिक सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते, तर श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावला.
शरद पवार यांचे कट्टर समर्थक
राजकीय प्रवासात त्यांनी पुढे काँग्रेस पक्षात प्रवेश केला व शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले गेले. काँग्रेसमधील त्यांचे स्थान प्रभावी होते आणि ते अखेरपर्यंत पवार साहेबांच्या विचारधारेसोबत राहिले.
सामाजिक नात्यांतही सखोल बांधिलकी
कृष्णराव भेगडे यांच्या पश्चात मुलगी राजश्री म्हस्के, जावई राजेश म्हस्के, दोन नाती, पुतण्या असा परिवार आहे. आमदार कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका राजश्री म्हस्के यांचे वडील, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे खजिनदार राजेश म्हस्के यांचे सासरे, तर उद्योजक आनंद गुलाबराव भेगडे यांचे चुलते होते.
एक दूरदृष्टीचा नेता, एक शिक्षणप्रेमी समाजसेवक, आणि एक सुसंस्कृत मार्गदर्शक… कृष्णराव भेगडे यांचे योगदान मावळच्या इतिहासात अढळ स्थान मिळवून देणारे ठरले आहे. त्यांना मावळवासीयांनी अंतिम श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याचा वारसा जपण्याचा निर्धार व्यक्त केला.
राजकारण आणि समाजकारण करताना कृष्णराव भेगडे यांनी आपले आयुष्य समाजासाठी वाहून घेतले. कृष्णराव भेगडे आज सत्तेत नाहीत मात्र, आजही त्यांचा शब्द मावळ तालुक्याच्या विकासात अंतिम मानला जातो.
म्हणूनच तालुक्यातील जनतेने त्यांच्यावर प्रेम केले.
विधानसभा, विधानपरिषदेवर त्यांना मिळालेल्या राजकीय संधीचे त्यांनी सोने केले. कृष्णराव भेगडे कायम आपल्या विचारांशी प्रामाणिक राहिले. त्यांनी दूरदृष्टी दिलेल्या मावळ तालुक्यातील अनेक शिक्षण संस्थांनी या तालुक्याला मोठे ज्ञान भंडार दिले.
भेगडे साहेब चार वेळा आमदार त्यावेळी निवडून आले. रामभाऊ म्हाळगी यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन त्यांनी आपला राजकीय श्री गणेशा केला.
कृष्णराव भेगडे यांच्या राजकीय आठवणी अमाप आहेत परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संरक्षणमंत्री असलेल्या शरद पवार यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून परत येताना विधिमंडळाचे सदस्य होणे बंधनकारक होते. अशा वेळी कृष्णराव भेगडे यांनी स्वतः हुन विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांनी मावळ तालुक्यात रस्त्यांचे जाळे विणले, आंदरमावळात आश्रम शाळा उभारणी असो वा लोणावळ्यात तंत्रशिक्षण देणाऱ्या ‘आयटीआय’ची उभारणी असो. कृष्णरावांनी या सगळ्या कार्याला वाहून घेतले. सर्वच क्षेत्रांच्या विकासासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
लोणावळ्याला ‘इंडस्ट्रिअल इस्टेट’ आणि टाकवे येथे इंद्रायणी औद्योगिक वसाहतीच्या निर्मितीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. मावळ तालुक्याचा चेहरामोहरा बदलायला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणावर रोजगार उभे राहिले, त्यातून अनेक कुटुंबांना हक्काचा निवारा मिळाला. भेगडे यांनी जनसेवेचा ध्यास, कामाचा उरक आणि आवाका या जोरावर मोठे समाजकार्य उभे केले. कोणताही वैयक्तिक स्वार्थ समोर न ठेवता ते कायम निस्वार्थी जनसेवक म्हणून जगले.