मावळ ऑनलाईन – ‘आला हो गारुडी, आला आला हो गारुडी या (Kalapini)गाण्यावर सगळ्यांनी उस्फुर्तपणे टाळ्यांचा गजर करत नागपंचमीच्या कार्यक्रमाची सुरवातच दणक्यात केली. मग झिम्मा,फुगडया,फेर अशा विविध पारंपारिक नागपंचमीच्या खेळांनी कलापिनीचे प्रांगण दुमदुमुन गेले. दरवर्षी प्रमाणे काल मंगळवार दि. 29 रोजी कलापिनी बालभवन,महिलामंच आणि स्वास्थ्ययोग अशी संयुक्तिकपणे नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने पारंपारिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुध्दे आणि जेष्ठ सदस्यांच्या हस्ते नटराजपूजन आणि नागपूजन करण्यात आले.बालभवन प्रमुख मधुवंती रानडे यांनी सर्वांचं स्वागत करुन प्रास्तविक केले.सुरवातीला स्वास्थ्ययोगी महिलांनी सुंदर फेर धरुन पंचमीचं महत्व सांगणारं गाणं सादर केलं. नंतर झिम्मा, दंड फुगडी,चौफुला फुगडी, हटुश्श पान बांई हटुश्श्, नाच गं घुमा,गोफ, लाट्या बांई लाट्या, या लाह्या कशाच्या, होडी नावाडी अशा अनेक खेळांचा मुलांनी आणि महिलांनी मनसोक्त आनंद लुटला.
खेळतांना कुणाचंही वय आड येत नव्हतं. छोटी मुलंही उत्साहाने खेळत होती आणि जेष्ठ महिलाही तेवढ्याच उत्साहाने खेळात सहभागी झाल्या होत्या. ह्या खेळांमुळे स्त्रियांचा सहज सुंदर असा शारीरीक व्यायाम तर होतोच त्याच बरोबर सगळ्यांना एकत्र खेळल्याचे समाधान मिळते.विचारांची देवाण-घेवाण होते. त्याचा त्यांना नक्कीच फायदा होतो.
Pasaydaan: १४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत ‘पसायदान’ पठणाचे आदेश
Bhaje Leni: भाजे लेणीजवळ दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू
सगळ्या महिला,छोट्या मुली अगदी छान नटून-थटून नऊवारी, भरजरी वेषभूषा करुन आल्या होत्या.खेळतांना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वाना लाह्या आणि फुटाण्यांचा प्रसाद देण्यात आला. पाऊस असून देखील महिलांची आणि मुलांची उपस्थिती भरपूर होती. संपूर्ण कार्यक्रमाची तयारी पांढरेकाकू आणि सहकाऱ्यांनी उत्तम केली होती. त्यांना सहकार्य बालभवन प्रशिक्षिकांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिप्ती आठवले, मीरा कोण्णूर आणि रेखा रेंभोटकर यांनी केले. शेवटी घरी जातांना सगळ्याच महिला नागपंचमी खूप छान साजरी झाल्याची प्रतिक्रिया देतांना अतिशय आनंदून गेल्या होत्या.