मावळ ऑनलाईन –इन्कम्प्लीट थिएटर व रंगभूमी डॉट कॉम ची निर्मिती असलेला कथाकार दि. बा. मोकाशी यांच्या मूळ कथेवर आधारित ‘वणवा’ हा दीर्घांक कलापिनी सांस्कृतिक केंद्राच्या अवकाश समीप रंगमंचावर चोखंदळ प्रेक्षकांच्या उपस्थितीत नुकताच सादर करण्यात आला.
कथेपासून सादरीकरणापर्यंत नेहमीच वेगळे प्रयोग करू बघणाऱ्या शिवम पंचभाई यांनी नाट्यरूपांतरीत व दिग्दर्शित केलेला हा एकपात्री दीर्घांक प्रेक्षकांचं अवधान रोखून धरण्यात यशस्वी झाला. समृद्धी खडके या नवोदित अभिनेत्रीने घनदाट जंगलात वास्तव्य असणाऱ्या कातकरी समुदायातील विविध वयोगटांची, विविध मानसिकतेची पात्रं आपल्या आवाजातून आणि देहबोलीतून लीलया साकारली आणि प्रेक्षकांची दाद मिळवली. रश्मी माळी, प्रज्ञा समर्थ या दोन कलाकारांनीही लयबध्द शारीरिक हालचालींमधून सादरीकरणाचा एकूण परिणाम अधिक प्रभावी केला.
दरवर्षी लागणाऱ्या जंगली वणव्यांमध्ये अनेक आप्त गमावलेल्या आणि आता एकट्याच राहिलेल्या कातकरी स्त्रीच्या आयुष्यावर झालेल्या परिणामांचं आणि तिच्या मनोधैर्याचं दर्शन हा दीर्घांक आपल्याला घडवतो. दि. बा. मोकाशी यांच्या मूळ कथेची बलस्थानं कायम ठेवत अभिनय, पूरक पार्श्वसंगीत आणि पार्थ घासकडबी, इंद्रनील हिरवे या तरुण संगीतकारांनी स्वरबद्ध केलेली लोकसंगीताचा बाज असलेली, ठेका धरायला लावणारी नवी गाणी, वणव्याची दाहकता आणि त्या स्त्रीची मानसिक स्थिती तसंच वर्तमान, भूतकाळाचा मेळ घालून देणाऱ्या प्रकाशयोजनेनं सादरीकरणाचा भावनिक आणि दृष्य आलेख चढता ठेवला.
अभिनेते मोहन खांबेटे यांच्या हस्ते कलाकारांच्या वतीने शिवम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी प्रयोगानंतर कलाकारांचं कौतुक केलं.
शिवम पंचभाई यांनी संगीतसंयोजन तर योगेंद्र साने यांनी प्रकाशसंयोजन केलं होतं तर संपूर्ण प्रयोगाचे संयोजन चेतन पंडित, प्रतीक मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तमरित्या करून प्रेक्षक चळवळीची खुंटी अधिक बळकट केली.

