मावळ ऑनलाईन (विवेक इनामदार) – सत्तेचे रंग बदलले, झेंडे बदलले, पक्ष बदलले… पण एक गोष्ट मात्र कधीच बदलली नाही — ती म्हणजे माजी आमदार कृष्णराव भेगडे आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केशवराव वाडेकर यांची अपार, अढळ, नि:स्वार्थ मैत्री (Friendship)!
राजकारणात कट्टर विरोधक, पण वैयक्तिक आयुष्यात अगदी जिवलग मित्र. भेगडे हे जनसंघातून सुरुवात करून एस काँग्रेस, काँग्रेस, नंतर राष्ट्रवादीपर्यंत गेले; तर वाडेकर यांनी जनसंघ ते थेट भाजपची वाट चालत पक्षाशी अखंड निष्ठा राखली. तरीही या परस्परविरोधी विचारधारांमध्ये मैत्रीचं नातं (Friendship) कधीही डळमळलं नाही.
राजकीय मंचावर एकमेकांविरोधात भाषणं झाली, पण खासगी आयुष्यात मात्र सहजीवनासारखी साथ राहिली.इंद्रायणी विद्या मंदिर सारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये दोघांनी खांद्याला खांदा लावून काम केलं. गाठी-भेटी, घरगुती कार्यक्रम, सुखदुःखाचं वाटप… या दोघांची मैत्री गावकऱ्यांसाठी एक प्रेरणा ठरली.
कितीही तात्विक मतभेद असले, तरी त्यांचं नातं (Friendship) विश्वासावर आणि परस्पर सन्मानावर उभं होतं. गावात राजकीय संघर्ष होत असतानाही त्यांनी कटुतेला कधीच वाट दिली नाही. उलट त्यांच्या संयमित वागणुकीमुळे तळेगावात शांतता आणि सुसंवाद टिकून राहिला.
Pimpri: हिंदी सक्तीचा निर्णय रद्द;महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आनंदोत्सव साजरा!
आज त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से गावागावांत सांगितले जातात — कधी कुणाच्या लग्नात दोघेही एकत्र हजर, कधी वादळात संस्थेच्या कामासाठी एकत्र धावपळ, तर कधी राजकीय सभेतून बाहेर येऊन हास्यविनोदाच्या गप्पा!
आणखी एक विलक्षण योगायोग… ३० जून — या दिवशी केशवराव वाडेकरांचा जन्मदिन आणि याच दिवशी कृष्णराव भेगडे यांनी जगाचा निरोप घेतला. एकाचा ‘जन्मदिवस’, दुसऱ्याचा ‘स्मृतिदिन’ — एकाच दिवशी. ही तारीख आता तळेगावासाठी ‘मैत्रीदिन’ ठरणार आहे.कदाचित नियतीला ही मैत्री देखील जपून ठेवायची होती… म्हणूनच, ‘ही दोस्ती (Friendship) तुटायची नाय’ हेच शेवटचे वाक्य दोघांच्याही आठवणींसाठी अढळ ठरणार आहे.