बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर आरोपींविरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा (Dhananjay Munde Resignation) मागितला आणि आज विधीमंडळाच्या कामकाजाच्या आधीच मुंडे यांनी आपल्या पीए प्रशांत जोशी यांच्यामार्फत राजीनामा सादर केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल आदी नेते उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत धनंजय मुंडे देखील सहभागी होते. जवळपास दीड ते दोन तास झालेल्या चर्चेनंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा (Dhananjay Munde Resignation) रात्रीच लिहून घेतल्याची चर्चा रंगली आहे.