मावळ ऑनलाईन – जमिनीच्या वादातून पुतण्यावर काठीने डोक्यात मारहाण करून दुखापत केल्याची घटना कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कांब्रेनामा (ता. मावळ) गावात घडली. याप्रकरणी वयोवृद्ध चुलत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नथू बबन गायकवाड (वय ६५, रा. कांब्रेनामा, ता. मावळ, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली असून, त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या चुलत्याचे नाव मारुती कोंडू गायकवाड (वय ७८, रा. कांब्रेनामा) असे आहे.
ही घटना शनिवारी, दि. २८ जून २०२५ रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजता घडली. फिर्यादी नथू गायकवाड हे माळवडी शिवारातून आपल्या घरी परत येत असताना घराजवळच चुलते मारुती गायकवाड यांनी त्यांना थांबवले. त्यानंतर अचानक हातातील काठीने त्यांच्या डोक्यात मारून जाणीवपूर्वक दुखापत केली. यावेळी आरोपीने, “तुझ्यामुळे माझी जमीन गेली, तुला जिवंत ठेवणार नाही,” अशा शब्दांत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली.
या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जखमी नथू गायकवाड यांनी उपचार घेतल्यानंतर कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.