मावळ ऑनलाईन न्यूज : ‘जर्मन भाषा गुरु’ हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून, परदेशी भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ते मार्गदर्शक ठरेल. सर्वांनी आवर्जून हे पुस्तक वाचावे आणि त्याचा उपयोग करावा, असे आवाहन तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष विलास भेगडे यांनी केले.
‘करियर हब टेक्नॉलॉजी’चे संस्थापक व प्राचार्य कैलास गाढे यांच्या ‘जर्मन भाषा गुरु’ या पुस्तकाचे प्रकाशन आकुर्डी येथे झाले. ‘डी. वाय. पाटील विद्यापीठ, आंबी’चे डॉ. दिलीप पांडुरंग देशमुख, समाजसेवक चंद्रकांत दामोदर कुलकर्णी, विजय पाटील, गोविंद पाटील, पत्रकार योगेश्वर माडगूळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
माडगूळकर व देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “‘जर्मन भाषा गुरु’ हे पुस्तक वाचनीय असून, गाढे सरांनी जर्मन भाषा शिकवताना मराठीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे विद्यार्थी परकीय भाषा शिकतानाच मातृभाषेचा अभिमानही जपत आहेत,” डॉ. देशमुख म्हणाले, विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत म्हटले की, “विद्यार्थ्यांनी आपल्या परिश्रमाने आणि योग्य मार्गदर्शनाने मिळविलेले यश हे शिक्षकांसाठी अभिमानास्पद आहे.”
करियर हब टेक्नॉलॉजीच्या श्वेता गाढे , गणेश आनेराये , कृष्णाकांत सरनाईक , अनिकेत सूर्यवंशी यांनी संयोजन केले. प्राचार्य कैलास गाढे यांनी आभार मानले.




















