मावळ ऑनलाईन – भाजे मावळ येथील श्री शिवाजी उदय मित्र मंडळाच्या (Bhaje Maval)वतीने यावर्षी गणेशोत्सवानिमित्त आकर्षक देखावा सादर करण्यात आला. त्यामुळे तमाम गणेश भक्तांकडून कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळाला. नुकतेच, युनेस्कोच्या यादीत महाराष्ट्र व कर्नाटकातील मराठा साम्राज्यातील १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. यामध्ये मावळ तालुक्यातील लोहगड या किल्ल्याचा देखील समावेश होतो. मंडळाने यावर आधारित आकर्षक देखावा सादर केला होता. सर्व १२ किल्ल्यांची छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली होती.
महत्वाचे म्हणजे यामध्ये श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाच्या योगदानाबद्दल गुणगौरव करण्यात आला होता. गेली २५ वर्षे मंच लोहगड व विसापूर या किल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अविरतपणे कार्यरत असल्याचा कार्यगौरव सचित्र सादर करण्यात आला होता. तसेच, या निमित्ताने श्री गणेशाच्या आरतीचा मान देण्यात आला व मंचाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, संदीप गाडे, बसप्पा भंडारी, सागर कुंभार, सचिन निंबाळकर, अनिकेत आंबेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अभिजित काळे, ऋषिकेश, रितेश ,सतीश गाडे, विठ्ठल नगिने, आदी कार्यकर्त्यांनी केले होते.
Lunar Eclipse : भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री होणार खग्रास चंद्र ग्रहण संपूर्ण भारतात दिसणार!
Nana Peth Murder : असा होता खुनाचा घटनाक्रम, नाना पेठेत आज कडक बंदोबस्त

मंचातर्फे लोहगडावर गेली २५ वर्षे दुर्गसंवर्धनाचे कार्य सुरू आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने गडावरील जीर्ण झालेल्या शिवमंदीराचा सर्वप्रथम जीर्णोद्धार करण्यात आला. महाशिवरात्री यात्रा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. भारतीय पुरातत्व विभागाकडे मंचातर्फे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे गडाला नवीन गणेश दरवाजा बसविण्यात आला. गडाचे दरवाजे आता सायंकाळी ५ वाजता बंद केले जातात. त्यामुळे गडावर घडणारे गैरप्रकार बंद झाले. मंचाने भारतीय पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी गडाच्या इतर सुधारणांसाठी पाठपुरावा केला व त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देखील मिळाला. गडाला पायऱ्या, बुरुज, तटबंदी आदींच्या दुरुस्तीची कामे चालू झाली. मंच व लोहगड ग्रामस्थांच्या वतीने लोहगड पायथ्याला शिवभक्तांसाठी प्रेरणादायी भव्य शिवस्मारक उभारणी देखील करण्यात आलेली आहे.
पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्याने मंच गेली २५ वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लोहगड दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहे. या निमित्ताने या शिवकार्यात आपला खारीचा वाटा उचलतो आहे. परंतू, या निमित्ताने श्री शिवाजी उदय मित्र मंडळ भाजे यांनी या कार्याची दखल घेणे खरोखरच कौतुकास्पद असल्याची भावना मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी व्यक्त केली.