मावळ ऑनलाईन (कामिनी मकरंद जोशी) – गेल्यावर्षी मे महिन्यात (Bali Pass Trek)आम्ही ४,५५० मीटर वरचा सतोपंथ स्वर्गा रोहिणी ट्रेक केला. तो पहिला अवघड ट्रेक होता. या ट्रेकचा अनुभव खूपच सुंदर होता. आणि त्यानंतर ठरवलं की आता याहीपेक्षा थोडा अवघड ५००० मीटर वरचा ट्रेक करायचा. आणि त्या दृष्टीने शोधाशोध सुरू केली बोरासु पास,बाली पास , मयाली पास असे अनेक ट्रेक बघितले, पण बाली पासचा व्हिडिओ बघून असं वाटलं की हाच ट्रेक करायचा आणि त्या दृष्टीने डेहराडून मधील ‘ट्रेक अप इंडिया’ यांच्याशी संपर्क साधला. एकूण ८ दिवसांचा ट्रेक होता. आवश्यक ते सर्व सामान घेणं, पण जास्त वजन वाढू न देणं हे आमच्या समोरचं आव्हान होतं. त्या दृष्टीने पौष्टिक खाऊ, साधे कपडे, थंडीचे कपडे, यांच्या वजनात पुन्हा पुन्हा कपात करून पुन्हा ते भरून बघणे. हे सर्व करत असताना पु.लं. च्या ‘अपूर्वाई ‘ची च आठवण झाली. आणि आमचीच आम्हाला गंमत वाटली…. हुश्श्य…शेवटी सामानाचं पॅकिंग करून झालं.
आम्ही दिनांक २३ मे रोजी अगस्तीमुनीहून निघून डेहराडून ला पोहोचलो.दुसऱ्या दिवशी २४ मे ला सकाळी ६:३० वाजता डेहराडून मधील प्रिन्स चौक येथे आमचा सगळा ग्रुप जमा झाला. उदयपूर ,चेन्नई,बेंगलोर ,मुंबई , उत्तराखंड अशा ठिकाणहून लोक आले होते. आम्ही सांकरी या ठिकाणी जाण्यासाठी गाडीत बसलो. आता हळूहळू आम्ही एकमेकांशी रुळायला लागलो होतो, एकमेकांच्या ओळखी वाढायला लागल्या व आपलेपणा वाटू लागला. सगळ्यांचं मिळून एक कुटुंबच तयार झालं जणू.संध्याकाळी आम्ही सांकरी या ठिकाणी येऊन पोहोचलो. हे ठिकाण १९०० मीटर
उंचीवर होते. सांकरी हे ठिकाण म्हणजे ३२ ट्रेकचा बेस कॅम्प आहे ही माहिती आम्हाला आमच्या ट्रेक गाईड कडून तिथे समजली. त्यामुळे प्रत्येक ट्रेकिंग कंपनीने इथे स्वतःचं गेस्ट हाऊस बांधलेले आहे. आम्हीही ट्रेक अप इंडिया ने बांधलेल्या त्यांच्या गेस्ट हाऊस मध्ये राहिलो. रात्री सर्वांचं जेवण झाल्यावर, प्रत्येकाने आपली रीतसर ओळख करून दिली. कोणी किती ट्रेक केलेत, ट्रेक बद्दलचा अनुभव, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. नंतर प्रत्येकाचे ओळखपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र , गोळा करण्यात आले.आणि आमचे ट्रेक प्रमुख ‘विवेक राणा’ यांनी आम्हाला आमच्या प्रवासाचा मार्ग, आवश्यक साहित्य,आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची मानसिकता कशी असली पाहिजे हे समजावून सांगितले. त्यांनी ‘पर्यटक’ आणि ‘ गिर्यारोहक’ या मधील फरक स्पष्टपणे सांगितला. पर्यटक आरामाची अपेक्षा करतो, छोट्या छोट्या गोष्टीत असमाधानी असतो. याउलट, गिर्यारोहक हा “प्रयत्नशील व्यक्ती” असतो. त्याला स्वतःलाच कष्ट करावे लागतात आणि म्हणूनच तक्रारींना जागा नसते. त्याने प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. “Trekker is effort person” हे खरोखरच आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखे वाक्य त्यांनी सांगितले.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हापासून चालायला सुरुवात केली तेव्हापासून सतत पाऊस सुरूच होता. खरंतर तो पाऊस, रस्त्यात झालेला चिखल, बघून असं वाटत होतं की नको आता पाऊस पण निसर्गापुढे मानव काय करू शकणार.. याचा प्रत्यय आला…असो. पुढील ३ तासात आम्ही आमच्या पहिल्या कॅम्पसाईटवर ‘चिलूडगाड’ इथे पोचलो. इथली उंची होती २५०० मीटर.
Rajesh Kumar Dubey: पीसीयू आणि यूजीसी करारामुळे फॅकल्टी डेव्हलपमेंट आणि बहुविषयक शिक्षणाला चालना – डॉ. राजेश कुमार दुबे
चालता चालता वाटेतील झऱ्यांशी थांबणं, त्याचं गार पाणी बाटलीत भरून घेणं, आणि रस्ता भर छान गार पाणी पीत जाणं असं पूर्ण ट्रेक संपेपर्यंत आम्ही अनुभवलं. आणि प्रत्येक वेळी “पाणी हेच जीवन” आहे हे पुरेपूर पटलं. कारण काही ठिकाणी अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे बॅगमध्ये असलेला डबा पण खाता आला नव्हता पण गार पाण्याचे घोट घेत घेत आम्ही निसर्गरम्य रस्त्यावरून चालत राहिलो. वाटेत दिसणाऱ्या हिरवळीच्या विविध छटा कॅमेऱ्यात टिपत होतो, दऱ्यांमधली बदलणारी दृश्ये,जंगल, वाहत्या नद्या, धबधबे, यांच्या सानिध्यात चालत चालत ३१०० मीटर उंचीवरील आमची पुढची कॅम्पसाईट रेनबसेरा येथे पोहोचलो. त्या पुढची कॅम्पसाईट रुईन्सारा, उंची होती ३६०० मीटर आणि त्याची पुढची कॅम्प साईट अजून खूप उंचीवर म्हणजे शेवटची वृक्षरेषा ओलांडल्यानंतर अगदी हिमपर्वतांच्या कुशीत होती, त्या कॅम्पसाईट चे नाव होते ओडारी. याची उंची होती ४१०० मीटर.
रोज ७-८ तास चालून, दमून भागून आल्यावर आता जरा टेन्टमध्ये आराम करू असा विचार मनात आला की लगेच आमचे ट्रेक गाईड विवेक यायचे आणि बाहेर बोलवायचे. प्रत्येक दिवसाच्या ट्रेकपूर्वी आणि नंतर आमच्याकडून वॉर्म-अप आणि कूल-डाऊन व्यायाम करून घ्यायचे. अर्थात ते केल्यावर आम्हाला खरंच आराम मिळायचा. कॅम्पसाईटवर आम्हाला क्रिकेट खेळण्याचा आनंदही मिळाला. समोर छान वाहत असलेली नदी, आणि डोक्यावरील मोकळं आकाश,याच्या मोहात पडून बराच वेळ आम्ही तंंबू च्या बाहेरच होतो.
आत्तापर्यंत जी गोष्ट अनुभवण्यासाठी आम्ही अधीर झालो होतो ती गोष्ट मिळाली ते म्हणजे बर्फ.आमचा बर्फावरील ट्रेक ओडारी येथे सुरू झाला.
आम्ही लांबच लांब असलेल्या प्रसिद्ध नर्माकांडी रिज वरून चाललो. रिज म्हणजे दोन्ही बाजूंनी तीव्र उतार असलेली अरुंद वाट. यावरुन चालत ४६०० मीटर उंचीवर असलेल्या “बाली कोल” बेस कॅम्पला पोहोचलो. जिथे नजर जाईल तिकडे सगळीकडे पांढराशुभ्र बर्फ… जमिनीचा तुकडा सुद्धा दिसत नव्हता.. या बर्फावरच आमचे टेन्ट होते….म्हणजे आज रात्री बर्फावर झोपायचं या कल्पनेनंच अंगावर काटा आला… पण दुसऱ्याच क्षणी हा अनुभव घ्यायला मन आतुर झालं . आज इथे ऊनही खूप होते त्यामुळे बर्फावरील त्या उन्हाचा डोळ्यांना खूप त्रास होत होता. आणि तंबू मध्ये तर भट्टी असल्यासारखं उकडत होतं.
त्यामुळे डोळ्यांना गॉगल लावून शक्य तितका वेळ आम्ही तंबू च्या बाहेरच राहिलो. पण थोड्यावेळाने स्नो-फॉल सुरू झाला त्यामुळे थोडा वेळ त्याचा आनंद घेऊन आम्ही टेन्ट मध्ये गेलो. छतावर चांगलंच बर्फ जमा झालं त्यामुळे आमच्याबरोबर असलेले गाईड, इतर मदतनीस, यांनी आमच्या टेन्टवरचं बर्फ काढून टाकलं. आम्ही आत मध्येच होतो आणि ते टेन्ट हलवून हलवून बर्फ काढत होते या गोष्टीची खूपच मजा वाटली आम्हाला. पण ते बर्फ लगेच काढलं नाही तर टणक होतं आणि टेन्टवर वजन वाढून टेन्ट दबू शकतो म्हणून ते लगेच काढावं लागतं. थोड्यावेळाने पुन्हा आकाश निरभ्र झालं आणि आम्ही टेन्ट बाहेर एकत्र आलो आमच्या गाईडने दुसऱ्या दिवशी सकाळच्या सर्व सूचना दिल्या,

बर्फावरून चालण्यासाठी घालायला लागणारे गेटर आणि बुटाला लावण्यात येणारे मायक्रो स्पाईक आम्हाला दिले. आमच्या गाईडने त्याचे प्रात्यक्षिकही दिले.सर्व बाजूंनी पसरलेला पांढराशुभ्र बर्फ, आजूबाजूचा काळा कुट्ट काळोख, यातून वाट काढण्यासाठी प्रत्येकाच्या डोक्यावर हेड लॅम्प लावायचे होते. या सगळ्याची तयारी करून, उरलेल्या सामानाचे पॅकिंग करून,जेवून आम्ही टेन्ट मध्ये झोपलो.
Ganesh Maharaj Mohite : संगीत विशारद गणेश महाराज मोहिते यांचा शिष्यांकडून सत्कार
PCMC : “बांधकाम पाडलं, तर बाळाला खाली टाकून आम्हीपण आत्महत्या करू” ; अतिक्रमण विरोधी पथकाला दाम्पत्याची धमकी
दुसऱ्या दिवशी सकाळी आमची मोहीम सुरू झाली.आम्ही पहाटे ३:३० वाजता उठलो.
बाली पास या ४९५० मीटर वरील समिट पॉईंटला पोहोचण्यासाठी लवकरच म्हणजे पहाटे सव्वाचारला आम्हाला निघायचे होते. त्यामुळे आम्ही पहाटे ४ वाजताच आपापले गेटर मायक्रो स्पाईक हेड लॅम्प हे सर्व घालून व सामान घेऊन तयार झालो. बर्फावरून चालत जायचे असल्यामुळे आज दुप्पट एनर्जी लागणार होती. या सगळ्याचा विचार करूनच आम्हाला पहाटे ४ वाजता दलिया व हरभऱ्याची उसळ असा नाष्टा देण्यात आला.व्यवस्था उत्कृष्ट होती.
सर्वांनी एक दिलाने परमेश्वराचं स्मरण करून “हरहर महादेव” अशी मोठ्याने घोषणा देऊन सव्वाचार वाजता चढाई करायला सुरुवात केली.मायक्रो स्पाईक वगैरे लावून बर्फावरून चालण्याचा हा पहिलाच अनुभव होता पण पायाखालच बर्फ घट्ट असल्यामुळे तुलनेने आम्हाला त्यावरून जाणं सोपं गेलं.
आम्ही हळूहळू पुढे पुढे जात होतो. जास्त उंचीवर चालत असल्याने दम लागण्याची शक्यता होती. त्यामुळे आमच्या गाईडने आम्हाला सूचना दिल्या होत्या की, समजा एखाद्याला विश्रांती घेण्यासाठी, दम घेण्यासाठी थांबायचं असेल तर त्याने मोठ्याने ओरडून सांगायचं आणि सगळ्यांनीच थांबायचं.आता आम्ही समिट च्या शेवटच्या टप्प्याजवळ पोहोचलो.इथेही एका अतिशय अरुंद अशा रिज वरूनच चालायचं होतं.
या ठिकाणी चालणं अतिशय अवघड होतं कारण एका बाजूला बर्फाच्छादित तीव्र उतार, आणि दुसऱ्या बाजूला मोठ- मोठ्या दगडांचा तीव्र उतार, त्यामुळे मधल्या अरुंद रिज वरून आम्ही मुंग्या जशा एका लाईनीत एका मागोमाग एक जातात तशाच पद्धतीने चालत होतो कारण दुसरी वाटच नव्हती असं सर्व दृश्य समोर दिसत असून सुद्धा त्याचा डोक्यात इतर काही विचार न करता एक एक पाऊल चालत राहणं अतिशय अवघड काम होतं परंतु ते आम्ही सर्वांनी मिळून यशस्वीपणे पूर्ण केलं.
आम्ही चढत असताना, आमच्या मागे सोनेरी सूर्यप्रकाश दिसला, ज्यामुळे स्वर्गरोहिणी शिखरांचे संपूर्ण दृश्य दिसून आले. ते चित्तथरारक होते. आम्ही चढत राहिलो आणि अखेर बाली पास च्या शिखरावर पोहोचलो. स्वर्गारोहिणी, बंदरपूंच आणि इतर अज्ञात बर्फाच्छादित शिखरांच्या भव्य दृश्यांनी आम्ही मंत्रमुग्ध झालो. इतक्या बिकट रस्त्यावरून आम्ही सर्वजण १७ गिर्यारोहक एकमेकांच्या मदतीने इथे येऊन पोहोचलो.आमच्या डोळ्यातल्या आनंदाश्रृंनी आमची जॅकेटं ओली झाली. सर्वजण अतिशय उत्साहात आनंदात आपापले आणि निसर्गाचे फोटो काढण्यात मग्न झाले होते.
खरंच इतक्या वरती पोहोचल्यावर निसर्गाची उदात्तता बघून अतिशय धन्य, कृतार्थ झाल्यासारखं वाटलं… आपल्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं… आपण काही न मागता निसर्ग आपल्याला किती भरभरून देत असतो याची जाणीव झाली.निसर्गाची ही किमया बघुन खरोखरच मन अगदी भरून आलं.. आणि आपल्याला हे सगळं अनुभवता आलं म्हणून स्वतःबद्दल अभिमान सुद्धा वाटला!! निसर्गाचे शतशः आभार मानत सगळेजण काही वेळ शांतपणे बसून राहिलो. पण लवकरच हवामान बदललं आणि धुक्यात हे सौंदर्य अदृश्य झालं, डोळ्यासमोर फक्त धुकं,धुकं, आणि धुकं . आता आमच्या पुढे सगळ्यात मोठ्ठं आव्हान उभं राहिलं ते म्हणजे या धुक्यातून खाली उतरणे.
सुरुवातीला आम्ही खडकांवरून उतरलो मग बर्फावरून आणि नंतर पुन्हा खडकावरून अशी तारेवरची कसरत करत , हे सगळे तीव्र उतार आम्ही उतरत होतो. आदल्या दिवशी बेस कॅम्पवर पोहोचल्यापासून, आम्ही जवळजवळ २० तास बर्फात होतो.
बदलते हवामान, निसरडी वाट, ही आव्हानं झेलत असतानाच निसर्गाने आमची आणखी परीक्षा घेण्याचे ठरवले. आणि स्नो-फॉल सुरू झाला. आम्ही आमचे पोंचो म्हणजे रेनकोट घातले आणि आणखी १० किमी चालत राहिलो. बर्फवृष्टीमुळे आम्हाला जेवण करता आले नाही, पण शेवटी आम्ही लोअर धामणी (३५०० मीटर) येथील आमच्या कॅम्पवर पोहोचलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी यमुनोत्री ला उतरून मग तिथून डेहराडून ला परत आलो.
अशारितीने उत्तराखंडमधील बाली पास ट्रेक पूर्ण केल्यावर आम्हा उभयतांना अतिशय आनंद झाला. आठ दिवसांचा हा ट्रेक रोमांचक, आकर्षक आणि आव्हानात्मक होता. तो पूर्ण करुन ५००० मीटर पार केल्यामुळे आमचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे आणि नवनवीन पर्वतशिखरांसाठी मोहिमा हाती घेण्याचे बळही मिळाले आहे.