मावळ ऑनलाईन – योग विद्येतुन सर्वांचे आरोग्य चांगले रहावे,मनाचे स्वास्थ्य निरामय रहावे,(Sunil Shelke) प्रत्येकाचे जीवन आनंदाने बहरून यावे या शुद्ध प्रामाणिक हेतुने व सेवाभावनेने श्रीक्षेत्र देहू पंचक्रोशीतील घराघरांपर्यंत योग विद्येचा प्रचार व प्रसार करणारे एक निर्मळ, निरपेक्ष वृत्तीचे सेवाव्रती व्यक्तीमत्व व आदर्श योग शिक्षक म्हणुन दत्तात्रय भसे सरांचे कार्य मोलाचे व सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी श्रीक्षेत्र देहू येथे केले.
श्रीक्षेत्र देहू योग विद्या धामचे संस्थापक गुरुवर्य दत्तात्रय भसे सर यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन श्री क्षेत्र देहूतील योग विद्या धाम शाखेने केले होते. सन २००८ पासून योग विद्या धामच्या माध्यमातून योग शिक्षक दत्तात्रय भसे सरांनी देहू पंचक्रोशीमध्ये ७० योगशिक्षक घडविले असून या १६ वर्षात २००० पेक्षा जास्त योग साधकांना निरामय, आरोग्यदायी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले आहे. अशा या निर्मळ, नि:स्पृह, निरपेक्ष सेवावृतीने योग विद्येचा प्रचार व प्रसाराचे कार्य करणारे आदर्श योग शिक्षक दत्तात्रय भसे सर यांचा शाल, श्रीफळ, जगद्गुरू तुकोबारायांची मूर्ती व सन्मानपत्र प्रदान करून सपत्नीक सत्कार मावळ तालुक्याचे आमदार सुनीलआण्णा शेळके, योगविद्या गुरुकुलचे कुलगुरू डॉ.विश्वास मंडलिक गुरुजी, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे सर, योग विद्या गुरकुलचे अध्यक्ष डॉ.रमेश पांडव, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष श्री. जालींदर महाराज मोरे, सौ. पौर्णिमाताई मंडलिक, वारकरी दर्पणचे संपादक सचिन पवार, डॉ. निलेश वाघ, सांगुर्डी गावचे सरपंच वसंत भसे, देहू देवस्थानचे विश्वस्त वैभव महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, आचार्य श्री. अर्जुन महाराज साळुंके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
Talegaon Dabhade: संगीताच्या सप्तस्वरांनी गाजली तळेगावकरांची ‘दीपसंध्या’


या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने भसे सरांच्या कार्याचे सिंहावलोकन करणाऱ्या ‘अमृतयोगी‘ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. योग विद्येत पारंगत असणाऱ्या अनेक मान्यवरांसह देहू पंचक्रोशीतील अनेक योग शिक्षकांचे आज पर्यंतच्या भसे सरांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या अनेक सुंदर, आशयसंपन्न, वाचनीय अशा लेखांचा समावेश या ‘अमृतयोगी’ ग्रंथात करण्यात आला आहे. वारकरी दर्पणचे संपादक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाने प्रा. विकास कंद यांनी या ग्रंथाचे संपादन केले असून सारंग गोरे या युवा चित्रकाराने मुखपृष्ठ सजविले आहे. या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ बंधु-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ कंद यांनी केले. आभार प्रदर्शन श्री.राहुल जाधव यांनी केले.



















