मावळ ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील वलवण गावातील (Valvan)जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे पांडुरंग पाळेकर निवास येथील श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरीची धाडसी घटना घडवली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या दरवाज्याची कडी तोडून आत प्रवेश करत देवीचा अडीच किलो वजनाचा चांदीचा मुखवटा, चांदीची प्रभावळ, चांदीची छत्री आणि देवीच्या गळ्यातील सव्वा तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण साडेपाच किलो चांदी व सोन्याचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेत देवीच्या मूर्तीच्या पाषाणाचा काहीसा भाग तुटल्याचेही निदर्शनास आले आहे.
सकाळी नियमितपणे मंदिराची साफसफाई करणारे ‘मामा’ मंदिरात आले असता दरवाज्याची कडी तुटलेली व आतमधील वस्तू गायब असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी तत्काळ ही माहिती मंदिर व्यवस्थापक रमेश पाळेकर यांना दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन रमेश पाळेकर यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात संपर्क साधला.
त्यानंतर लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे, स्थानिक गुन्हे पथकाचे अधिकारी रईस मुलाणी व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मंदिर परिसराची पाहणी करून चोरीची पद्धत व चोरट्यांच्या हालचालींबाबत प्राथमिक तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांनी कोणत्या मार्गाने प्रवेश केला आणि कोणत्या दिशेने पसार झाले, याचा शोध घेतला जात आहे.
तसेच पुणे ग्रामीण पोलिसांच्या श्वान पथकाला पाचारण करून घटनास्थळावरून चोरट्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लोणावळा परिसरात मंदिर व घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी नांगरगाव येथे एका रात्रीत सहा ठिकाणी चोरी व चोरीचे प्रयत्न झाल्याची नोंद आहे. पोलिसांनी गस्त वाढवली असली तरी वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.