मावळ ऑनलाईन – तळेगाव-चाकण महामार्गावर लोखंडी साहित्याने(Talegaon-Chakan highway) भरलेल्या ट्रेलरमुळे झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना रविवारी (दि. 7 सप्टेंबर) रात्री सव्वाबाराच्या सुमारास माळवाडी (ता. मावळ) येथील श्री लिला हॉटेलसमोर घडली.
मृत महिला शालुबाई विष्णु गुंड (वय 67, रा. कामोठे, पनवेल, नवी मुंबई / मूळगाव वडगाव दर्या, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) अशी आहे. जखमींमध्ये शितल रंगनाथ आहेर (34), शिवांश रंगनाथ आहेर (5), रंगनाथ आहेर (36), स्वप्निल गुंड (34) आणि संदेश हरिशचंद्र ढेरे (19 सर्व राहणार कामोठे, पनवेल, नवी मुंबई) यांचा समावेश आहे. जखमींवर तळेगाव दाभाडे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, चाकणच्या दिशेने लोखंडी साहित्य घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने आळेफाटा येथून मुंबईकडे चाललेल्या पिकअप टेम्पोला धडक दिली. ट्रेलरने टेम्पोला ठोकरून उलट्या दिशेला फरफटत नेले. त्यानंतर मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेलरने तसेच आणखी एका ट्रकने या वाहनांना जोरदार धडक दिली. चार वाहनांच्या या विचित्र धडकेत पिकअपमधील महिलेचा मृत्यू झाला.
Firing : भावकीतील तरुणीला घरी सोडल्याचा कारणावरून वडगाव मावळ येथे गोळीबार,तरुण बालंबाल बचावला
Pune : पादचारी पूल उभारणीसाठी भिडे पूल आज मध्यरात्रीपासून बंद
अपघातानंतर ट्रेलरवरील लोखंडी साहित्य रस्त्यावर विखुरले. यामुळे महामार्गावर दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, अपघात घडवून ट्रेलरचालक वाहनासह पसार झाला.
या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.