मावळ ऑनलाईन – लोणावळा शहराने यंदा पुन्हा एकदा(Lonavala) आपली ओळख कायम ठेवली आहे. यावर्षी लोणावळा शहरामध्ये आजअखेर तब्बल 5141 मिमी म्हणजेच 202.40 इंच इतक्या पावसाची नोंद झाली असून, मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या 4838 मिमी (190.47 इंच) पावसाच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक आहे. 25 ऑगस्ट रोजी 24 तासांमध्येच 72 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
लोणावळा परिसरात पावसाला मे महिन्यातच सुरुवात झाली होती. त्यानंतर सलग चार महिने – मे, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये जोरदार पावसाचा अनुभव नागरिकांनी घेतला. विशेषत: मागील आठवड्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचले होते. त्याचबरोबर इंद्रायणी नदीला पूर आल्याने ग्रामीण भागातही पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.
PMPML : गणेशोत्सवात पीएमपीएमएल बस मार्गांमध्ये बदल
Vijayrao Kalokhe : तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी विजयराव काळोखे

लोणावळा शहर व परिसर हा दरवर्षी मुसळधार पावसासाठी प्रसिद्ध आहे. यावर्षीही हा परंपरागत पाऊस ओघवता राहिला असून, दररोज पावसाची रिपरिप सुरूच आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे निसर्गसंपन्न लोणावळ्यात पर्यटकांचा ओढा कायम राहण्याची चिन्हे आहेत.