मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून भाजपचे माजी शहराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील (Santosh Dabhade) हेच उमेदवार असावेत, आणि त्यांना पूर्ण पाठिंबा राहील, असे जाहीर करत आमदार सुनील शेळके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “राजकारण बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी आम्ही दोन पावले मागे येण्यासही तयार आहोत,” असे विधान करून त्यांनी संतोष दाभाडे यांना स्पष्ट पाठिंबा दिला.
बुधवारी (दि. २३ जुलै) संतोष दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव गौरव पुरस्कार प्रदान सोहळा व अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना आमदार शेळके यांनी दाभाडे यांच्याबद्दलचा आपुलकीचा आणि सहकार्याचा सूर व्यक्त केला.
काय म्हणाले आमदार शेळके?… पहा व्हिडिओ
शेळके म्हणाले की, मागील दहा वर्षांपासून संतोष दाभाडे (Santosh Dabhade) यांनी निर्मल वारीच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले आहे. “वारी जशी पंढरपूरकडे जाते, तसे हे व्यक्तिमत्त्वही त्या वारीमध्ये पूर्णपणे गुंगून गेलेले असते. त्यांनी पदाची, प्रतिष्ठेची अपेक्षा न ठेवता काम केले. 2024 च्या निवडणुकीत मला अनेक अडचणी आल्या, तेव्हा संतोष भाऊ यांनी मला आधार आणि धीर दिला,” असे त्यांनी नमूद केले.
DJ ban : डीजे बंदीचा निर्णय सर्वच प्रकारच्या मिरवणुकांना लागू
महायुतीतील 60-40 फॉर्म्युला बाजूला ठेवत, “जरी हा आमच्या पक्षाचा उमेदवार नसेल, तरी आमचा पाठिंबा संतोष भाऊंना राहील. यापुढे कुणालाही अन्यायकारक फॉर्म्युला देऊ नये, सर्वांनी एकत्र काम करावे,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

शेळके यांनी पक्षाविषयी बोलताना सांगितले की, “अजित दादा यांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे सुनील शेळकेचा शब्द हा तालुक्याचा शब्द समजला जातो.” शहराच्या विकासाबाबत ते म्हणाले, “श्री डोळसनाथ मंदिर, श्रीराम मंदिर, पाच पांडव आणि हनुमान मंदिराचे बांधकाम, तलावांचे सुशोभीकरण, क्रीडांगण, बाग बगिचे, नगरपरिषद इमारतीचे लोकार्पण आणि नव्याने उभारला जाणारा दवाखाना – ही सर्व कामे एकत्र येऊन पूर्ण करायची आहेत.”
कार्यक्रमात नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आमदार शेळके यांनी स्पष्ट शब्दांत जाहीर केले की, “महायुतीचा उमेदवार म्हणून संतोष भाऊ वस्ताद (Santosh Dabhade) यांना पूर्ण पाठिंबा आहे, आणि शहराच्या विकासासाठी कोणतेही राजकारण न करता आम्ही त्यांच्यासोबत राहू.”
