या यावर्षीचा तळेगाव दाभाडे शहराचा (Talegaon Dabhade)सार्वजनिक गणेशोत्सव हा शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक आणि सामाजिक भान ठेवत ‘डीजे मुक्त’ साजरा करावा असे आवाहन तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी केले आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या वतीने (दि १९) रोजी सुशीला मंगल कार्यालय येथे गणेश मंडळे व शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस निरीक्षक थोरात बोलत होते. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे महिला शांतता समितीच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे व्यासपीठावर उपस्थित होत्या. तसेच तळे व दाभाडे पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Nigdi: निगडी प्राधिकरण येथे सशस्त्र दरोडा
Talegaon Dabhade: स्वावलंबी शिक्षण ही आताच्या काळाची गरज- बाळा भेगडे
थोरात पुढे बोलताना म्हणाले की, लहान बालके,जेष्ठ नागरिक, हृदयविकार पिडीत रुग्ण,गर्भवती महिला तसेच पशूपक्षांना होणारा त्रास व आवाजाचे प्रदुर्षणामुळे येणारा बहिरेपणा, रेडीयशनच्या विद्युत रोषणाईच्या वापरामुळे डोळ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी या गणेशोत्सवात गणरायाचे आगमन तसेच विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर पूर्णतः बंद करण्याचे नियोजन केले असून संबधित मंडळांनी डीजेचा वापर केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी थोरात यांनी दिला आहे.

गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्ती शाडू मातीच्या असाव्यात, निर्माल्य नद्यांमध्ये अथवा तलावांमध्ये टाकू नये. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विसर्जन करू नये. मंडळांनी विजेचा वापर काळजीपूर्वक करावा. मिरवणुकीची समाप्ती शासनाच्या वेळेनुसार असावी. आदी सुचानाच्या समावेत तसेच यावर्षी डीजे मुक्त मिरवणुकीचा संकल्प असून या साठी परवानगी मागणे, अँडव्हान्स करून बुकिंग करून मंडळाचे आर्थिक नुकसान करून घेऊ नये. अश्या सुचना तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी व्यक्त केल्या.
शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, एक गाव एक गणपती किंवा एक वॉर्ड एक गणपती या संकल्पना राबवण्यावरही भर देण्यात आला आहे. उत्सव अधिक सुसंगत, शांततेत आणि खर्चिक न होता एकत्रितपणे साजरा व्हावा यासाठी मंडळांनी एकमेकांशी समन्वय साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय गणेशमूर्ती खरेदी करताना पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा, शाडू माती, कागदी लगदा, लाकूड, दगड यापासून बनविलेल्या मूर्तींचा किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या मूर्तींचा अवलंब करावा, असेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.
यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने केवळ सांस्कृतिक नव्हे तर समाजोपयोगी उपक्रमांवरही भर दिला जाणार आहे. आरोग्य शिबिरे, रक्तदान, स्वच्छता मोहिमा, रुग्णांसाठी अन्नदान किंवा आवश्यक साहित्यांचे वाटप अशा उपक्रमांचे आयोजन करून गणेश मंडळांनी सामाजिक भान ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंडपांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंसेवकांची उपस्थिती, अँबुलन्स आणि अग्निशमन यंत्रणा यांसह आवश्यक सुरक्षिततेची संपूर्ण व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्युत उपकरणांची खात्रीपूर्वक तपासणी करून त्याचे प्रमाणपत्र मिळवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
मंडपाजवळ व मिरवणुकीदरम्यान स्त्री-पुरुषांची वेगळी व्यवस्था, योग्य अंतरावर बेरिकेट्स, कोणतेही अनुचित वर्तन अथवा मद्यप्राशनास बंदी, संशयित व्यक्ती अथवा वस्तू आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देणे अशा बाबींवरही विशेष भर देण्यात आला आहे. विसर्जन मिरवणूक निश्चित वेळेत आणि शिस्तबद्धरित्या पूर्ण करावी, तसेच पोहता न येणाऱ्या व्यक्तींना पाण्याजवळ न नेता सुरक्षा जपावी, अशी सूचनाही यावेळी देण्यात आली.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, वरीलपैकी कोणत्याही अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यास आयोजकांवर मुंबई पोलीस अधिनियम, पर्यावरण संरक्षण कायदा, तसेच ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिनियम आदी कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी जबाबदारीने, नियमांचे पालन करत आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरेल अशा पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे कळकळीचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी यावेळी केले.
यावेळी माजी नगरसेवक अरुण माने,प्रशांत ताये,माजी नगराध्यक्षा मीरा फल्ले,फुले,शाहू,आंबेडकर समितीचे सचिव जयंत कदम,श्री गणेश मंडळाचे विश्वस्त श्रीकांत मेढी,शिक्षण मंडळाचे माजी सभापती मनोहर दाभाडे, मावळ वन्यजीव रक्षक संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांनी डीजे बंदीच्या संकल्पनेचे मनोगतामधून स्वागत केले. यावेळी दत्तात्रय बनसुडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रमिला क्षीरसागर,सुरेश यमगर, उपनिरीक्षक भारत वारे यांनी सभेचे नियोजन केले.तर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कांबळे यांनी आभार मानले.