मावळ ऑनलाईन –श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालय, शाळा चौक, तळेगाव दाभाडे येथे शनिवारी संध्याकाळी एक प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे औचित्य होते कै. कमलिनी पुरुषोत्तम परांजपे वाचन कक्षाचे नूतनीकरण व सुशोभीकरण लोकार्पण सोहळा आणि इयत्ता १०वी व १२वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या आगमनाने आणि दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर नूतनीकरण झालेल्या वाचन कक्षाचे लोकार्पण दिलीप भाई विष्णुदास शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक व स्वागतपर भाषण संस्थेचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी यांनी केले. त्यांनी या वाचनालयाच्या सामाजिक कार्याची माहिती देत उपस्थितांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समीर धनराज परमार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
Khalumbre:कामावर जाण्यास उशीर झाल्याने लिफ्ट मागितली अन घात झाला; कंटेनर खाली चिरडून दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप भाई शहा होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वाचनसंस्कृतीचा युवकांवर होणारा सकारात्मक प्रभाव विषद केला.तसेच स्वतःच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने सोहळा न करता सेवाकार्यांना निधी दिला,असे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या सौ. स्मिताताई दिवेकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या प्रवासासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी यशासाठी संकल्प,संघर्ष,सातत्य,संयम आणि स्वीकार या पाच “स”कारातून वाटचाल करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमात यावर्षी इयत्ता १०वी व १२वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पेनड्राईव्ह देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थिनी जीनल ओसवाल सी ए झाल्याबद्दल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
Jadhavwadi: कंपनीतील साहित्याची चोरी; दोघांना अटक
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आर्या देशमुख, श्रावणी शेलार, शिवानी पाटोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या यशामागील संघर्ष व प्रेरणास्त्रोतांविषयी सांगून उपस्थितांना भारावून टाकले.
सूत्रसंचालन अविनाश राऊत व हीना दोशी यांनी केले.पदमनाभ पुराणीक यांनी “लोहगड” किल्ल्याला युनेस्कोने दिलेल्या सन्मानाचे निवेदन करून संस्थेच्या वतीने आनंद व्यक्त केला.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.
या कार्यक्रमात संस्थेचे चिटणीस प्रीतम भेगडे, खजिनदार यतीन शहा, रामचंद्र रानडे, प्रशांत दिवेकर, सागर शहा, ललित गोरे, पद्मनाभ पुराणिक महेंद्र जैन, अक्षय अभ्यंकर, आणि सौ संध्या गाडे, हिना दोशी या कार्यक्रमास उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिक, पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रेरणादायी उपक्रमामुळे वाचनालयाच्या कार्याला नवी दिशा व चालना मिळाली असून, गुणवंत विद्यार्थ्यांना सामाजिक सन्मानाची ऊर्जा मिळाली.