मावळ ऑनलाईन – “विठ्ठल… विठ्ठल…” च्या गजराने तळेगाव दाभाडेच्या श्री गजानन महाराज मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. निमित्त होते आषाढी एकादशीचे, आणि या पवित्र दिवशी मंदिरातील संस्कार वर्गाच्या वतीने आयोजित केलेल्या बाल वारकऱ्यांच्या दिंडीने सर्वांच्या मनाला स्पर्श करणारा भक्तिरस निर्माण केला.
ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, संत नामदेव, संत सावता माळी अशा विविध संतांच्या वेशभूषेत सजलेली बालचमू हातात टाळ-मृदुंग घेत, अभंग गात, विठ्ठलनामाचा गजर करत पुढे पुढे चालली होती. रुख्मिणी-विठोबा या स्वरूपात सजलेल्या लहानग्यांनी उपस्थित भाविकांचे मन पूर्णपणे जिंकून घेतले. निरागस चेहऱ्यांवर भक्तिभाव, अंगात उत्साह, आणि ओठांवर ‘पांडुरंग… पांडुरंग…’ असा नामस्मरणाचा गजर… हा सोहळा अनुभवणाऱ्यांना क्षणभरासाठीच का होईना, पण वारकऱ्यांच्या पंढरपूर वारीचा जणू प्रत्यक्ष साक्षात्कार घडला.
Dehugaon:देहूत डॉक्टर्स असोसिएशनकडून वृक्षारोपण


या दिंडी सोहळ्यातील आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे खास या प्रसंगासाठी बनवलेली आणि सुंदरपणे सजवलेली पालखी. ही पालखी अनिकेत विटवेकर यांनी स्वतः तयार करून मंदिरास अर्पण केली. पालखीमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती आणि ती पालखी बाल वारकऱ्यांनी मोठ्या भक्तिभावाने फुलांनी सजवलेल्या मार्गाने मिरवली.
Shankar Jagtap: पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत चर्चविरोधात कारवाईची मागणी — आमदार शंकर जगताप यांची विधानसभेत लक्षवेधी सूचना
या भक्तिपर्वामागे गेली तीन वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेले श्री गजानन महाराज सेवा मंडळ (ट्रस्ट) हे संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवक यांचे योगदान कौतुकास्पद आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा उपक्रम नियमितपणे साजरा केला जात आहे.
कार्यक्रमाचे संयोजन ज्योती मुंगी, विजया इनामदार, अनिता बोकील आणि अलका विटवेकर यांनी परिश्रमपूर्वक केले, तर कुंदा कुलकर्णी आणि सुनील वाळुंज यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या भक्तिमय दिंडी सोहळ्याला पालक आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उस्फूर्त प्रतिसाद दिला. बालचमूंचा निखळ भक्तिभाव आणि त्यांच्या तोंडून ऐकायला मिळणारे अभंग हे पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणारे ठरले. दिंडी संपली तरी त्या गजराचा नाद आणि त्या लहान वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील भक्तिभाव प्रत्येकाच्या मनात घर करून गेला.
या उपक्रमामुळे नव्या पिढीला संतपरंपरेची ओळख झाली असून, लहान मुलांच्या माध्यमातून भक्तीची बीजे समाजात रुजत असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आले.