मावळ ऑनलाईन – “मी आमदार आहे, कारण तुम्ही माझ्या मागे उभे राहिलात. आज निर्णय घ्यायचे असतील, तर तोही तुमच्या सल्ल्यानेच घ्यायचा,” अशा शब्दांत आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
या मेळाव्यात संघटनेच्या सुदृढ बांधणीसाठी, मैदानावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भक्कम नियोजन करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
संघटनेच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांचे नेतृत्व
आमदार शेळके यांनी जाहीर केले की, “गाव अध्यक्ष, नगरसेवक, सरपंच वा अन्य पदांसाठी उमेदवार ठरवताना २० जणांची समिती निर्णय घेईल आणि त्या निर्णयाचे मीही पालन करेन.”
त्यांनी स्पष्ट केले की, “पक्षाला मजबूत करायचे असेल तर नेतृत्व नव्हे, तर निर्णय कार्यकर्त्यांनी घ्यायला हवा.”
त्यांनी भाजपवर टीका करत म्हटले, “पूर्वी म्हणायचे – ‘तुम लढो, हम कपडे संभालेंगे’; आता म्हणतात – ‘तुम लढो, हम कॉन्ट्रॅक्ट संभालेंगे’! ही भूमिका आता खपवून घेतली जाणार नाही.”
Maval:मावळमध्ये ‘खट्टे एंटरप्रायजेस’चा नवा उपक्रम : एका तासात १२०० भाकरी, तेही चुलीवरच्या!



महायुतीच्या संदर्भात स्पष्ट भूमिका
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, “महायुती म्हणून आपण एकत्र काम करण्याचा प्रयत्न करत असलो, तरी माझा पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते – हे माझे खरे बळ आहे. माझा पक्ष, माझा कार्यकर्ता, ही माझी जबाबदारी आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहणे, हेच माझं खऱ्या अर्थाने आमदारपण आहे.”
संघटनात्मक आढावा व नियोजन
या मेळाव्यात आतापर्यंतच्या पक्षकार्याचा आढावा घेण्यात आला. मैदानी अडचणी समजून घेऊन उपाययोजना, कामकाजातील सुधारणा, निवडणुकांचे नियोजन यावर चर्चा झाली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांप्रती एकनिष्ठ राहून जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा
या मेळाव्यात पक्ष विस्ताराचा भाग म्हणून विविध विभागांमध्ये पुढील नवनियुक्त्या करण्यात आल्या –
- सुवर्णा राऊत – महिला अध्यक्ष, मावळ तालुका
- वर्षा नवघणे – ग्रामीण महिला अध्यक्ष
- सुरेश धोत्रे – तळेगाव शहर अध्यक्ष
- सुशांत बालगुडे – विद्यार्थी आघाडी अध्यक्ष
- रवी पवार – सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष
- कुणाल आगळे – सामाजिक न्याय विभाग, तळेगाव शहर
- निलेश टाक – सामाजिक न्याय विभाग, देहूरोड शहर
- हरिश्चंद्र बगाड – आदिवासी सेल अध्यक्ष, मावळ तालुका
संघर्षाला न्याय, संघटनेला बळ
“माझ्या अडचणीच्या काळात तुम्ही माझ्या मागे उभे राहिलात, आज मी तुमच्या मागे उभा आहे,” असे शेवटी म्हणत आमदार शेळके यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली.
“सामाजिक, राजकीय किंवा विकासकामाच्या बाबतीत निर्णय घेताना आता प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखला जाईल. गावपातळीवरील नेतृत्वही कार्यकर्त्यांच्या मताने ठरेल.”
प्रमुख उपस्थिती
या मेळाव्यास तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, गणेश ढोरे, सुरेश चौधरी, विठ्ठल शिंदे, महादू कालेकर, काळूराम मालपोटे, दीपक हुलावळे, सुहास गरुड, लक्ष्मण बालगुडे, सुहास कालेकर, प्रकाश हगवणे, रुपेश घोजगे, संदीप आंद्रे, शोभाताई कदम, पूजाताई दिवटे, तेजस्विनी गरुड, सुनीता कुडे यांच्यासह विविध शहराध्यक्ष, महिला व युवक आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ तालुक्यातील संघटनेची नवसंघटना उभारणी झाली असून, आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी एकजूटीनं सज्ज राहण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले.