Team MyPuneCity –कोंढवा परिसरातील काकडेनगर येथे ट्रॅव्हल्सच्या मोकळ्या जागेत टेम्पोमधून प्रतिबंधित रजनीगंधा पानमसाल्याचा साठा आढळून आला असून, पोलिसांनी कारवाई करत तब्बल २ लाख ६४० रुपये किंमतीचा पानमसाला जप्त केला आहे. ही कारवाई कोंढवा पोलिसांच्या पथकाने २७ एप्रिल रोजी केली.
कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गणेश चिंचकर, लवेश शिंदे आणि अभिजीत जाधव हे आपल्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार चिंचकर यांना बातमीदाऱ्यामार्फत माहिती मिळाली. या माहितीनुसार काकडेनगर येथील एका मोकळ्या जागेत ट्रॅव्हल्स पार्किंगच्या जागी एक अज्ञात व्यक्ती त्याच्या लाल रंगाच्या टेम्पोमध्ये चार पांढऱ्या पिशव्यांमधून गुटख्यासदृश वस्तू ठेवत होता.
Maval Online Launching : ‘एआय’च्या युगात माध्यमांपुढे सृजनशीलता आणि विश्वासार्हता टिकविण्याचे आव्हान – राजीव खांडेकर
ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) अब्दुल शेख यांना देण्यात आली. त्यानंतर ते स्वतः आपल्या पथकासह घटनास्थळी गेले. पोलिसांना पाहताच संबंधित इसम टेम्पोसह तिथून पळून गेला, मात्र तो मागे चार पांढऱ्या पिशव्या सोडून गेला.
पोलिसांनी त्या पिशव्या तपासल्या असता त्यामध्ये रजनीगंधा नावाचा पानमसाल्याचा साठा आढळून आला. हा माल तात्काळ कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आला. २९ एप्रिल रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर हा साठा प्रतिबंधित पानमसाल्याचा असल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी संबंधित अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण २ लाख ६४० रुपये किंमतीचा प्रतिबंधित पानमसाला जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अब्दुल शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप, अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी उनवणे, तसेच पोलीस अंमलदार लवेश शिंदे, गणेश चिंचकर, अभिजीत जाधव, संतोष बनसुडे आणि विकास मरगळे यांच्या संयुक्त प्रयत्नांतून पार पडली.