Team MyPuneCity –रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या व्यक्तीला भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने धडक (Pune Crime News 27 April 2025)दिली. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी (२५ एप्रिल) रात्री मुळशी तालुक्यातील भोते वस्ती, सुस येथे घडला.
गणपत चांदेरे (सुस गाव, मुळशी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मुलगा तुषार गणपत चांदेरे (३५) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालक विठ्ठल फकिरा हाके (४६, थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Alandi News: आळंदी येथे पद्मावती रस्ता परिसरात काही ठिकाणी अशुद्ध पाणीपुरवठा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार यांचे वडील गणपत चांदेरे हे त्यांच्या मित्रांसोबत बोलत सुस-नांदे रोडवर थांबले होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने त्यांना धडक दिली. यामध्ये गणपत चांदेरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.
मुंबई-बेंगलोर महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यू
मुंबई-बेंगलोर महामार्गावर बावधन येथे एक अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी (२६ एप्रिल) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडला.
विशाल आनंदा लामखडे (३०) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. गणेश व्यंकट कासार (२२, कोथरूड) हे जखमी झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश कासार आणि त्यांचा मित्र विशाल लामखडे हे वाकड येथून पुणे शहरात दुचाकीवरून जात होते. मुंबई-बेंगलोर महामार्गाने जात असताना बावधन येथे त्यांच्या दुचाकीला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक बसल्यानंतर गणेश आणि विशाल दोघेही खाली पडले. गंभीर जखमी झाल्याने विशाल यांचा मृत्यू झाला. गणेश यांच्या दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. बावधन पोलीस तपास करीत आहेत.
शिवीगाळ करू नको म्हटल्याने एकास मारहाण
किरकोळ कारणावरून शिवीगाळ करणाऱ्यास शिवीगाळ करू नको, असे म्हटल्याने त्याने एकास मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (२५ एप्रिल) रात्री भोसरी येथे घडली.
दिनेशराव रामसजीवन वर्मा (३२, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमरदीप मालकर (भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनेशराव हे त्यांचा भाऊ कविराव यांच्यासोबत घराजवळ बसले होते. कविराव आणि त्यांच्या शेजारी राहणारा अमरदीप यांचे दोन दिवसांपूर्वी नळावर पाणी भरताना किरकोळ भांडण झाले होते. त्या कारणावरून अमरदीप याने कविराव यांना शिवीगाळ केली. त्यामुळे दिनेशराव यांनी आरोपीला शिवीगाळ करू नको, असे म्हटले. त्या कारणावरून आरोपीने दिनेशराव यांना मारहाण करून दुखापत केली. त्यांचा भाऊ मध्ये आला असता त्याला देखील धक्काबुक्की केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
बिटकॉइन मधील गुंतवणुकीच्या बहाण्याने ९६.९३ लाखांची फसवणूक
बिटकॉइन आणि युएसडीटी या डिजिटल करन्सी मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत मोठा नफा देण्याचा बहाणा करून एका व्यक्तीकडून ९६.९३ लाख रुपये घेत फसवणूक केली. ही घटना १५ जुलै २०२४ ते २२ एप्रिल २०२५ या कालावधीत रावेत येथे घडली.
याप्रकरणी रावेत येथील पीडित व्यक्तीने पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्ती आणि बँक खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने फिर्यादीला फोन वरून संपर्क केला. बिटकॉइन आणि युएसडीटी करन्सी मध्ये ट्रेडिंग केल्यास दररोज १०० डॉलर प्रॉफिट मिळेल, असे फिर्यादी यांना सांगण्यात आले. त्यांना मिळालेल्या प्रॉफिट मधील २० टक्के कमिशनची रक्कम एका लिंकच्या माध्यमातून द्यावे लागतील, असे सांगण्यात आले. फिर्यादी यांनी आरोपींना वेळोवेळी आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात ९६ लाख ९३ हजार २८९ रुपये पाठवले. त्यानंतर त्यांना कोणताही नफा अथवा गुंतवलेली रक्कम न देता त्यांची फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करीत आहेत.
महिलेकडे १० लाखांच्या खंडणीची मागणी
पतीचा खून झाला असून तिच्या मुलांच्या जीवाला धोका आहे, अशी धमकी देत महिलेकडे दहा लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १६ एप्रिल रोजी नवलाख उंब्रे येथे घडली.
याप्रकरणी महिलेने २६ एप्रिल रोजी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्तीने फिर्यादी महिलेला फोन केला. फोन वरील व्यक्तीने महिलेच्या पतीचा खून झाला असून तिच्या आणि तिच्या मुलांच्या जीवाला धोका असल्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. घाबरलेल्या महिलेने दहा दिवसानंतर याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.