Team MyPuneCity – शुक्रवारी पेठ येथील गणेश पेठेतील जयधन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या गौतम रासिकलाल सोळंकी (वय ५२) यांच्याकडून एक मजुराने १ कोटी ६० लाख रुपयांचे सोन्याचे बिस्किटे चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी नेताजी अरुण जाधव (वय ३३, रा. धर्मा नगर, मार्केट यार्ड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोळंकी यांनी जाधव याला काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी मजुरीवर कामासाठी ठेवले होते. त्यांनी तिजोरीमध्ये २ किलो वजनाची सोन्याची बिस्किटे ठेवली होती. जाधवने संधी साधून तिजोरीतील ही मौल्यवान बिस्किटे लंपास केली. याप्रकरणी फरासखाना पोलीस तपास करत आहेत.
२. बनावट शेअर ट्रेडिंग लिंकद्वारे फुरसुंगीतील ५० वर्षीय नागरिकाची ८.६२ लाखांची फसवणूक
पुणे – फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या एका ५० वर्षीय नागरिकाला ऑनलाईन शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने तब्बल ८ लाख ६२ हजार ३०० रुपयांची फसवणूक केली.
फसवणूक करणाऱ्याने मोबाइलवर लिंक पाठवून शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस नफा मिळेल असे सांगितले. त्यानंतर सदर व्यक्तीने लिंकवर क्लिक करून संबंधित खात्यात पैसे ट्रान्सफर केले. मात्र, त्यानंतर ना नफा मिळाला ना मूळ रक्कम परत मिळाली. याप्रकरणी हडपसर पोलीस तपास करत आहेत.
३. सासरच्यांच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा
पुणे – देवाची उरळी येथे २५ वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली.
याप्रकरणी तिचा पती आकाश विलास करनूरे (वय २७), सासरे विलास करनूरे (वय ५२) आणि सासू शोभा करनूरे (वय ४७, सर्व रा. कोंढवा बुद्रुक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेवर सातत्याने माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता, तसेच तिचा शारीरिक छळ केला जात होता. हवेली पोलीस तपास करत आहेत.
४. IAS अधिकारी असल्याचे सांगून तरुणाला ६.२७ लाखांना गंडा
पुणे – वानवडी परिसरातील ३३ वर्षीय तरुणाला दोन महिलांनी स्वतःला IAS अधिकारी असल्याचे भासवून लग्नाचे आमिष दाखवले आणि त्याच्याकडून ६ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केली.
फसवणूक करणाऱ्या महिलांनी वेगवेगळी कारणे सांगून त्याच्याकडून रक्कम उकळली आणि त्यानंतर संपर्क तोडला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलांचा शोध सुरू आहे.
५. मंहमदवाडी रोडवर दुचाकीस्वार चोरट्यांनी ६० हजारांचे दागिने हिसकावले
पुणे – मंहमदवाडी रोडवर एका ४७ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी भरदिवसा हिसकावून नेल्याची घटना घडली.
महिला रस्त्याने पायी जात असताना, मागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील साखळी हिसकावून पळ काढला. हडपसर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
६. सिटी बसमधून प्रवासादरम्यान २ लाख ४० हजारांचे दागिने चोरीला
पुणे – प्राईड चौक येथून सिटी बसने प्रवास करत असताना एका २१ वर्षीय महिलेच्या आईच्या पर्समधून तब्बल २ लाख ४० हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले.
पीडित महिला आणि तिच्या आईने लक्षात घेतले असता, पर्समधील दागिने गायब असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.