Team MyPuneCity – साकोरेनगरमधील प्लॅटिनम स्केअर बिल्डिंग येथील ‘सुमा इंटरनॅशनल इंटेरियर कॉन्ट्रॅक्टर प्रा.लि.’ या कंपनीच्या कार्यालयातून चार अज्ञात इसमांनी सुमारे ३.७७ लाख रुपयांचे संगणक, टॅब, सीपीयू आणि स्टेशनरी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २८ मार्च २०२५ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून, येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल ( Pune Crime News 23 April 2025) करण्यात आला आहे.
याप्रकरणी कार्यालयातील जबाबदार व्यक्तीने फिर्याद दिली असून, चोरट्यांनी पूर्वनियोजित पद्धतीने कार्यालयात प्रवेश करून महागडी इलेक्ट्रॉनिक साधने लंपास केली. चोरी नंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार शिंदे करत आहेत.
२. खराडीतील रस्त्यावर महिलेला लुटणाऱ्या दुचाकीस्वार चोरट्यांचा शोध सुरू ( Pune Crime News 23 April 2025)
चंदननगरमधील खराडी परिसरात रात्रीच्या सुमारास एका महिलेला दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी गळ्यातील ५२,००० रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून पलायन केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना २१ एप्रिल रोजी रात्री ९.५५ ते १० दरम्यान घडली.
२६ वर्षांची महिला ही रस्त्याने पायी घरी जात असताना चोरट्यांनी तिच्यावर लक्ष ठेवून अचानक झडप घालून तिची चैन हिसकावली आणि ते तिथून दुचाकीवरून पळून गेले. चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक असवले करत आहेत.
३. डेक्कन परिसरात अज्ञाताने ४० हजारांची चेन हिसकावली ( Pune Crime News 23 April 2025)
पुणे : प्रभात रोड, डेक्कन येथे आपल्या पत्नीसोबत उभ्या असलेल्या ४९ वर्षीय इसमाच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन एका अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २१ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जंगली महाराज रोडवरील गोधी दुकानासमोर घडली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. डेक्कन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
या प्रकरणाचा तपास महिला पोलीस अंमलदार धनश्री सुपेकर करत आहेत.
४. जुन्या वादातून लोखंडी हत्याराने हल्ला; एकावर जीवघेणा प्रयत्न ( Pune Crime News 23 April 2025)
ए.डी. कॅम्प चौकाजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून एका २२ वर्षीय तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला करून त्याच्या डोक्यावर गंभीर जखम करून जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना २३ एप्रिल २०२५ रोजी रात्री १.१५ वाजता मोची गल्ली, राजेवाडीसमोर घडली.
आरोपी आणि त्याचे साथीदार यांनी संगनमत करून हा हल्ला केला. घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. आरोपीविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे करत आहेत.